वांगी, ढबू, टोमॅटो दरात घट, सर्वसामान्यांना दिलासा
प्रतिनिधी/ बेळगाव
ऐन गणेशोत्सव काळात भाजीपाला दरात मोठी घसरण झाली आहे. विशेषत: ढबू, भेंडी, टोमॅटो, कारली, बिन्स, वांगी दरात घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. एकीकडे पावसाअभावी पिके सुकून जाऊ लागली आहे. दुसरीकडे बाजारात भाज्यांचे दर खाली आल्याने उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. यंदा पावसाअभावी भाजीपाला लागवडीत मोठी घट झाली आहे. त्यामुळे येत्या काळात भाजीपाला दरात मोठी वाढ होण्याची चिंता व्यक्त होत आहे.
शनिवारच्या आठवडी बाजारात बटाटा 30 रू. किलो, कांदे 30 रू. किलो, काकडी 40 रू. किलो, फ्लॉवर 20 रू. एक, वांगी 10 रू. किलो, ढबू 40 रू. किलो, गाजर 50 रू. किलो, बिन्स 40 रू. किलो, शेंवग्याच्या शेंगा 20 रू. एक, भेंडी 40 रू. किलो, ओली मिरची 40 रू. किलो, कारली 40 रू. किलो, टोमॅटो 15 रू. किलो, दोडकी 50 रू. किलो, कोबी 20 रू. एक, मेथी 10 रु एक 20 रूपयाला तीन पेंढ्या, कांदापात 20 रूपयाला 6 पेंढ्या, लालभाजी 10 रू. एक पेंढी, शेपू 10 रू. एक पेंढी, कोंथिबिर 20 रू. एक असा भाजीपाल्याजा दर आहे.
मागील आठवड्याच्या तुलनेत वांगी, ढबू, बिन्स, भेंडी, ओली मिरची, कारली, टोमॅटो, कांदापात आदींच्या दरात प्रतिकिलो 10 ते 20 रूपयांनी घट झाली आहे. विशेषत: एरव्ही 40 ते 50 किलो विकली जाणारी वांगी 10 रूपये किलो झाली आहेत. त्यामुळे नागरिक वांग्यांना पसंती देऊ लागले आहेत. गणेशोत्सवाची धामधूम सुरू असल्याने बटाट्याला मागणी वाढली आहे. बटाट्याचा दर प्रति किलो 30 रूपयावर स्थिर असल्याचे दिसत आहे.
यंदा म्हणावा तसा पाऊस झाला नाही, त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. तर पावसाअभावी पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. शिवाय नवीन भाजीपाला लागवडीचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे येत्या काळात भाजीपाला दरात मोठी वाढ होण्याचे संकेत दिले जात आहेत. सद्यस्थिती सर्रास भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. त्यामुळे भाजीपाला खरेदी करणे सोयीस्कर होऊ लागले आहे.
गणेशोत्सव काळात विविध ठिकाणी पूजा-अर्चा आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. सार्वजनिक मंडळांकडून विविध महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढली आहे. असे असले तरी किरकोळ भाजीपाला बाजारात बहुतांशी भाज्यांच्या दरात घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना ऐन सणा-सुदिच्या काळात भाजीपाला खरेदी करणे सोयीस्कर झाले आहे.