गोकुळ दूध संघातल्या गैरकारभारावर लेखा परीक्षण करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिल्यावर काही कालावधीनंतर लेखापरिक्षण थांबल्याचे वृत्त चुकीचे असून अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जात असल्य़ाचा आरोप गोकुळच्या संचालक शौमिका महाडिक यांनी केला आहे. त्यांनी यासंबंधित प्रसिध्दी पत्रक काढून विरोधकांवर आरोप केला.
आपल्या निवेदनात बोलताना त्या म्हणाल्या, ” गोकुळ दूध संघातल्या गैरकारभारावर मी सातत्याने आवाज उठवल्यानंतर आणि रीतसर पुराव्यानिशी मागणी केल्यानंतर संघाचे चाचणी लेखा परीक्षण करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले होते. त्यानुसार माहिती संकलनाचे काम प्रगतीपथावर खोडसाळपणाचे असून लेखापरीक्षण थांबल्याचे वृत्त प्रसिद्ध करून गोकुळच्या कर्मचारी आणि सभासदांची दिशाभूल केली आहे. यामागे कोणाचा हात आहे, याची कल्पनाही सर्वाना आहेच. वास्तविक गोकुळचा उत्कर्ष व्हावा, तसेच या दुध संघाची वाताहत होऊ नये, इथल्या भ्रष्टाचाराला आळा बसावा या हेतूने गोकुळच्या चाचणी लेखा परीक्षणाचा आग्रह आम्ही धरला होता. याला राजकीय आकस म्हणणं हा केवळ मनाचा कोतेपणा आहे.” अशी प्रतिक्रिया दिली.
पुढे आपल्या निवेदनात त्या म्हणाल्या, “अशा प्रकारचे वृत्त प्रसारित करून लेखापरीक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे का? याचीही शहानिशा केली पाहीजे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे गेल्या दहा वर्षांचे लेखापरीक्षण सुरू असल्यामुळे, गोकुळच्या लेखापरीक्षणाला थोडा विलंब झाला. पण आता राष्ट्रीय कृषी विकास योजनेची प्रक्रिया पूर्ण झाली असून तक्रारीतील ‘परिशिष्ट अ’शी संबंधित सर्व कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अत्यंत पारदर्शकपणे गोकुळचे लेखापरीक्षण सुरू असून लवकरच दूध का दूध आणि पानी का पानी होईल यात शंका नाही.” असा विश्वास त्यांनी दर्शविला.
शेवटी त्यांनी “एखादी शासकीय कारवाई किंवा चौकशी होत असताना कोणीही इतका उतावळेपणा करणे योग्य नाही. तपासातून जे काही निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कारवाईसुद्धा होईलच. याच भीतीने विरोधकांनी काही ठराविक लोकांना हाताशी धरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू केला असल्याचे ‘समजते’ ! तेव्हा आपल्याच माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छिते की, कोणी कितीही प्रयत्न केले तरी सत्य जनतेसमोर आल्याशिवाय हे लेखापरीक्षण थांबणार नाही.” असे आश्वासन दिले.