वार्ताहर /कणकुंबी
कणकुंबीसह परिसरातील पारवाड, बेटणे, चिखले, चिगुळे, हुळंद, माण, चोर्ला गावातील गणपतीचा विसर्जन सोहळा भक्तिमय वातावरणात जड अंतकरणाने पार पडला. विशेषत: गोव्याच्या कोकणी संस्कृतीचा प्रभाव असलेल्या घाट माथ्यावरील कणकुंबी-चोर्ला भागातील प्रत्येक गावागावात होळी, गणेशचतुर्थी दोन्ही सण उत्साहात साजरे केले जातात. कामानिमित्त महाराष्ट्र, गोवा व इतर ठिकाणी असणारे सर्व चाकरमानी शिमगा आणि गणेशचतुर्थीला आपापल्या गावी आवर्जून येतात. सात दिवस भक्तिमय वातावरणामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. प्रत्येक घराघरात सुंदर अशी आरास व सजावट केली जाते. जंगलातील अनेक सुगंधित फुलांचे आणि फळांचे तोरण मंडपी बांधली जाते. रंगरंगोटी करण्याबरोबरच गणपतीचा मंडप सुशोभित करण्यावर अधिक भर दिला जातो. अलीकडे चिखला, चोर्ला, कणकुंबी, पारवाड आधी गावामध्ये घरगुती हलते देखावे सुद्धा केले जातात. अशा गणेशोत्सवाची काल सात दिवसांनी भक्तिमय वातावरणात सांगता झाली. घरगुती गणपतीला निरोप देताना प्रत्येक घरातील गणपती व गौरीच्या नावाने एकवार ठेवून गोडधोड वाढले जाते. प्रत्येक घराघरात दुपारपर्यंतच्या विधी पार पडल्यानंतर चार वाजता सर्व गणपती गावातील मंदिराच्या किंवा तलावाच्या ठिकाणी एकत्र आणतात. त्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत आरती व इतर विधी पार पाडल्यानंतर आपापले गणपती डोकीवर घेऊन तलाव किंवा नदीकाठी जातात. त्या ठिकाणी धार्मिक विधी करून विसर्जन केले जाते. धार्मिक सोहळा पाहण्यासाठी सर्व अबालवृद्ध एकवटतात.