तलावांवर दुपारनंतर गणेशभक्तांची मोठी गर्दी : फटाक्यांच्या आतषबाजीत विसर्जन
बेळगाव : ‘गणपती बाप्पा मोरयाऽऽ, पुढच्या वर्षी लवकर या’ या जयघोषात बुधवारी दीड दिवसाच्या गणरायांना निरोप देण्यात आला. शहरातील विसर्जन तलावांवर दुपारनंतर मोठी गर्दी झाली होती. पारंपरिक पद्धतीने नागरिकांनी दीड दिवसाच्या बाप्पाला भक्तीभावाने निरोप दिला. फटाक्यांच्या आतषबाजीने विसर्जन मार्ग दणाणून निघाला होता. मंगळवारी घरगुतीसह सार्वजनिक श्रीमूर्ती विराजमान झाल्या. मागील दोन ते तीन वर्षांमध्ये कोरोनामुळे गणेशोत्सवावर निर्बंध होते. परंतु, यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने जल्लोषात गणरायाचे आगमन झाले. मंगळवारी सायंकाळपर्यंत घरोघरी गणेशमूर्ती आणल्या जात होत्या. तर रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक श्रीमूर्ती मंडपामध्ये दाखल झाल्या. काही कुटुंबामध्ये दीड दिवसाचा गणराय विराजमान होतो. मनोभावे पूजन केल्यानंतर बुधवारी गणरायाला निरोप देण्यात आला. नोकरदारवर्गाने दुपारी विसर्जन करणे शक्य नसल्याने सकाळपासूनच विसर्जनाला सुरुवात केली. महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या विसर्जन तलावांवर सकाळपासूनच गर्दी होती. जुना कपिलेश्वर विसर्जन तलाव, जक्कीनहोंड, अनगोळ, जुने बेळगाव, किल्ला येथील तलाव, कणबर्गी या ठिकाणी दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देण्यात आला.