पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागविल्या अनेक कटू-गोड स्मृती, आजपासून नूतन वास्तूत कार्यारंभ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘हे संसद भवन देशाचे भवितव्य घडविणाऱ्या अनेक ऐतिहासिक निर्णयांचे साक्षीदार राहिलेले आहे. या निर्णयांचा या सभागृहाला निश्चितच अतीव अभिमान वाटेल. आज या सभागृहाला अखेरचा निरोप देताना आणि सर्वजण भावूक झालेलो आहोत. या सभागृहाच्या आठवणींनी आपण गहिवरून जाणे स्वाभाविक आहे. या सभागृहात यापुढे कामकाज होणार नसले तरी त्याच्या आठवणी आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरतील हे नि:संशय आहे, अशा हृदयस्पर्शी शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1947 पासून भारताच्या कल्याणाचा भार वाहणाऱ्या जुन्या संसदगृहाला निरोप दिला आहे. या सभागृहातील अखेरचे भाषण करताना त्यांनी प्रथम पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यापासून प्रत्येक नेता आणि महत्वाच्या प्रसंगांच्या स्मृती जागृत केल्या. आता मंगळवारपासून नूतन संसदगृहात विशेष अधिवेशनाचे काम होणार आहे.
संसदेच्या विशेष अधिवेशनाला सोमवारी प्रारंभ करण्यात आला. हे अधिवेशन पाच दिवस, अर्थात 22 सप्टेंबरपर्यंत होणार असून त्यात आठ महत्वपूर्ण विधेयके सादर होणार आहेत. या पाच दिवसांमधील प्रथम दिवस जुन्या सभागृहातील कामकाजाचा होता. आगामी चार दिवस अधिवेशन नूतन सभागृहात होणार आहे. यापुढील सर्व संसदीय कार्य नूतन संसदगृहातच आयोजित केले जाणार आहे. त्यादृष्टीने हे विशेष अधिवेशनही एक इतिहास घडविणार आहे.
भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यातील सेतू
संसदेचे कार्य जुन्या संसदगृहातून नव्या संसदगृहात हस्तांतरित होणे ही महान घटना आहे. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना सेतूप्रमाणे जोडणारी ही घटना आहे. आता सर्व लोकप्रतिनिधी नव्या सभागृहात जाताना नवी आशा आणि नवा आत्मविश्वास घेऊन जातील. आपण सर्वजण जड अंत:करणाने पण नव्या उत्साहाने जुने सोडून नव्या सभागृहात प्रवेशणार आहोत, असे उद्गार त्यांनी काढले.
अनुच्छेद 370 निष्प्रभ होणे अभिमानास्पद
या सभागृहात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पण जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा राज्य घटनेचा अनुच्छेद 370 निष्प्रभ करण्याच्या निर्णयाचा या सभागृहाला विशेष अभिमान वाटेल. या निर्णयासह वस्तू-सेवा कर प्रणाली लागू करण्याचा निर्णय, एक पद एक निवृत्तीवेतन असे अनेक पथदर्शी निर्णय या सभागृहात घेण्यात आले. त्यांचाही प्रत्येकाला गर्व वाटेल. स्वातंत्र्यापसून आजवर या सभागृहात 7 हजार 500 हून अधिक लोकप्रतिनिधींनी काम केले. त्यांचे देशकार्य अविस्मरणीय आहे, असेही प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.
श्रम आणि धन भारताचेच
जुने संसद सभागृह परकीय सत्ताधींशानी निर्माण केले. तसे असले तरी या सभागृहासाठी धन आणि श्रम यांचे संपूर्ण योगदान भारताच्याच जनतेने केले. आता आपण नव्या वास्तूत जात असलो तरी ही जुनी वास्तू आगामी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. आपण सर्व या सभागृहाचे ऋणी आहोत. याच्या आठवणी नित्य आपल्यासह राहतील याची शाश्वती आहे, असेही उद्गार त्यांनी काढले.
साऱ्यांचेच महत्वाचे योगदान
आज भारताचे नाव साऱ्या जगात आदराने घेतले जात आहे. विशेषत: नुकत्याच राजधानी दिल्लीत भारताच्या नेतृत्वात पार पडलेल्या जी-20 परिषदेच्या यशापासून आपला देश जागतिक सन्मानाच्या शिखरावर आहे. मात्र, हे यश कोणा एका व्यक्तीचे नाही. आतापर्यंतचे सर्व पंतप्रधान, विविध मंत्री, संसदसदस्य आणि नेते यांचे ते सामुदायिक श्रेय आहे, अशी भावोत्कट मांडणी त्यांनी केली.
नेहरु, इंदिरा गांधी यांची प्रशंसा
भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी 15 ऑगस्ट 1947 या दिवशी मध्यरात्री 12 वाजता याच सभागृहात ‘नियतीशी केलेल्या करारा’चे साऱ्या देशाला रोमांचित करणारे वाक्य उच्चारले होते. त्याची स्मृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागृत केली. त्याचप्रमाणे बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा निर्णयही याच सभागृहात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घोषित केला, याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. या सर्व महनीयांच्या महत्वपूर्ण योगदानाने सारा देश आज प्रगतीपथावर असून त्याच्यासह सर्व नागरिकांचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी सर्व दिवंगत नेत्यांची प्रशंसा केली.
अटलबिहारी वाजपेयींचा गौरव
दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रथम पंतप्रधान म्हणून 6 वर्षे काम केले. कोणत्याही नेत्यापेक्षा, व्यक्तीपेक्षा किंवा पक्षापेक्षा देश सर्वतोपरी आहे. ‘सरकारे येतील आणि जातील, पण देश खंबीरपणे पुढे जात राहील, या वाजपेयी यांनी याच सभागृहात उच्चारलेल्या स्फूर्तीदायी वाक्याचीही आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात करुन दिली.
आणीबाणी, दहशतवादी हल्ला
1975 मध्ये याच सभागृहात देशावर आणीबाणी लादल्याची घोषणा त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली होती. तसेच 2001 मध्ये याच संसदेवर दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता. तो हल्ला केवळ या वास्तूवर नव्हता तर लोकशाहीच्या आत्म्यावरच होता. तो प्रसंग देश कधीही विसरणार नाही. ज्यांनी त्यावेळी दहशतवाद्यांच्या गोळ्या आपल्या निधड्या छातीवर झेलून या वास्तूचे आणि संसद सदस्यांचे संरक्षण केले, त्यांनाही त्यांनी विनम्र अभिवादन केले.
तो अनुभव अभूतपूर्व
ज्यावेळी मी प्रथम या संसदेत तिचा सदस्य म्हणून प्रवेश केला, तो अनुभव अभूतपूर्व होता. दारिद्र्यात जन्मलेला माझ्यासारखा एक बालक पुढे देशाचा नेता म्हणून या सभागृहात प्रवेश करेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. त्यामुळे प्रथम या संसदभवनाच्या पायऱ्या चढताना मी या वास्तूला डोके टेकवून प्रमाण केला होता. ती उत्कट भावना होती, अशी आठवणही त्यांनी उद्धृत केली. भारत भविष्यकाळात एकसंध राहील की नाही, अशी शंका स्वातंत्र्यानंतर अनेकांनी व्यक्त केली होती. तथापि, या संसदभवनाच्या साक्षीने भारताच्या जनतेने ही शंका अक्षरश: खोटी ठरविली आहे, याचा आनंद आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
अधिवेशनात सादर होणार 8 विधेयके
संसदेच्या विशेष अधिवेशनाचा प्रारंभ सोमवारी जुन्या वास्तूत झाला असला तरी प्रत्यक्ष काम नूतन वास्तूत आज मंगळवारपासून होणार आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आघाडीच्या वतीने 8 महत्वपूर्ण विधेयके सादर केली जाणार आहेत. अधिवक्ता (सुधारणा) विधेयक, वृत्तपत्रे अणि नियतकालिके नोंदणी विधेयक, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर आयुक्त नियुक्ती विधेयक, ज्येष्ठ नागरिक कल्याण विधेयक आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या संदर्भातील 3 विधेयके दोन्ही सभागृहांमध्ये सादर केली जातील, अशी माहिती दिली गेली आहे. ही सर्व विधेयके महत्वाची असून त्यांवर संसदेबाहेरही बरीच चर्चा आजवर झाली आहे. ती संमत झाल्यास मोठे प्रशासकीय परिवर्तन घडण्याची शक्यता आहे.
महिला आरक्षण विधेयक 20 ला
सत्ताधारी आघाडीच्या वतीने 20 सप्टेंबरला संसदेत महिलांना संसदेत आणि विधिमंडळांमध्ये आरक्षण देण्यासंबंधीचे विधेयक सादर केले जाणार आहे. या अधिवेशनाआधी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय झाला होता. रविवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सत्ताधाऱ्यांसह सर्वच पक्षांनी महिलांना हे आरक्षण देण्यासाठी समर्थन दिले होते. त्यामुळे हा निर्णय होत आहे.
पत्रकारांचे मानले आभार
गेल्या 75 वर्षांपेक्षा अधिकच्या काळात असंख्य पत्रकारांनी आणि माध्यमांनी संसदीय कामकाजाचे सटीक वृत्तांकन केले आहे. त्या सर्व पत्रकारांचा मी देशाच्या वतीने आभारी आहे, या पत्रकारांनी गौरवास्पद कार्य केलेले आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारांचे आभार मानले आहेत. अधिवेशनाआधी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांच्या कार्याचा उल्लेख केला आहे.
आज संसदेत काय होणार…
ड श्रीगणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नूतन संसद भवनामध्ये होणार कार्यारंभ
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी पायी चालत जुन्या वास्तूपासून नव्या वास्तूत जाणार
ड त्यांच्यासह लोकसभा, राज्यसभेचे खासदारही चालत नव्या वास्तूत जाणार
ड नूतन वास्तूच्या मुख्य सभागृहात लोकसभा, राज्यसभेची एकत्रित बैठक
ड त्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये नित्य कार्यास प्रारंभ केला जाणार
काय बोलले पंतप्रधान मोदी
ड या सभागृहाच्या आठवणी यापुढच्या पिढ्यांसाठीही असतील प्रेरणादायी
ड भारताच्या प्रगतीचे साक्षीदार असणाऱ्या या सभागृहाचे सर्वजण ऋणी
ड या सभागृहात घेतले गेले देशहितासाठीचे अनेक ऐतिहासिक निर्णय
ड प्रश्नांसाठी लाच, आणीबाणी, संसदेवरचा हल्ला या संतापजनक घटना
ड या सभागृहाच्या प्रत्येक नेत्याचे देशाच्या प्रगतीत महत्वपूर्ण योगदान
ड भारताचे प्रगती हे एक व्यक्तीचे नव्हे, साऱ्या देशाचे समुदायिक यश
ड 370 निष्प्रभता निर्णयाचा या सभागृहाला वाटतो सर्वाधिक अभिमान