बेळगाव : मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, च्या जयघोषात सोमवारी सात दिवसांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. सात दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी विसर्जन तलावांवर भक्तांची गर्दी झाली होती. कपिलेश्वर तलाव, जुने बेळगाव, वडगाव, जक्किनहोंडा रामेश्वरतीर्थ यासह इतर ठिकाणी बाप्पांचे विसर्जन झाले. विशेषत: घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मनपामार्फत उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दुपारनंतर भाविकांनी रात्री उशिरापर्यंत गणरायाला निरोप दिला.
मंगळवारी लाडक्या बाप्पांचे थाटामाटात आगमन झाले होते. त्यानंतर पूजा, अर्चा आणि इतर धार्मिक कार्यक्रमदेखील पार पडले. त्यानंतर दीड, पाच आणि सोमवारी सात दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात आला. महापालिकेतर्फे विसर्जन स्थळी विशेष सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी फिरते कुंड तर काही ठिकाणी निर्माल्य कुंड उभारण्यात आले आहेत. पर्यावरण पूरक विसर्जनासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय निर्माल्यासाठी विशेष कुंडांची उभारणी करण्यात आली आहे. त्याबरोबर भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी विसर्जनस्थळी प्रकाशाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गणेशमूर्ती विसर्जन करणे सोयिस्कर होवू लागले आहे. आता 28 सप्टेंबर रोजी अनंत चतुदर्शी दिवशी घरगुती गणेशमूर्तींबरोबर सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. या दिवशी विसर्जन स्थळावर मोठी गर्दी उसळणार आहे.