सावंतवाडी प्रतिनिधी
बळीराजा लुटणार हिरवं सोनं
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बहुतांशी भागात भात शेती दाणेदार झाली आहे. येत्या आठवड्याभरापासून हे दाणेदार झालेले भात कापण्याजोगे होणार आहे. यंदा पाऊस उशिराने सुरू झाला. परंतु समाधानकारक असा पाऊस यंदा सिंधुदुर्गात पडला. त्यामुळे भात पीक यंदा समाधानकारक स्थितीत आहे. मधील काळात पावसाने दडी मारल्याने भात शेती करपून गेली होती. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात पिकाला जीवदान मिळाले. सावंतवाडी, दोडामार्ग भागात बहुतांशी ठिकाणी भात शेती दाणेदार झाली असून भात पिकले आहे. त्यामुळे आता ते कापण्या जोगे झाले आहे. यंदा सप्टेंबरच्या अखेरीस भात पीक दाणेदार झाल्याने पाऊस परतीच्या मार्गावर असतानाच भात पीक कापण्या जोगे होणार आहे. त्यामुळे दर्जेदार असे पिकलेले भात यंदा शेतकऱ्यांना पाऊस पडत असतानाच कापण्याची वेळ येणार आहे की काय अशी भीती व्यक्त होत आहे. भात दाणेदार झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेश चतुर्थी कालावधीत गावागावात नवे घालण्याचा प्रकार आहे. यंदा गणेश चतुर्थीच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी बहुतांशी गावात देवस्थान मंदिरांजवळ नवे घालण्यात आले . नवे झाल्यानंतर गावागावात ग्रामीण भागात भात पीक कापण्यास सुरुवात केली जाते. त्यामुळे आता गणेश चतुर्थी कालावधीनंतर बहुतांशी भागात भात पीक कापण्याला सुरुवात होणार आहे.