कृषीतज्ञ विश्राम गांवकर यांचे आवाहन
फोंडा : गोव्यातील काजूच्या झाडांना खोड किड्यांपासून मोठा धोका असून दरवर्षी त्याची लागण झाल्याने काजूची लाखो झाडे मरून जातात. शेतकऱ्यांनी खोड किड्यांपासून काजूच्या पिकाचे रक्षण करण्याचे आवाहन कृषीतज्ञ विश्राम गांवकर यांनी केले. विभागीय कृषी कार्यालय वाळपई आणि सत्तरी शेतकरी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या काजू पिकांवरील परिसंवादात ते बोलत होते. शिरसोडे, सत्तरी येथे नुकताच हा कार्यक्रम झाला. या रोगापासून काजू झाडांचे संरक्षण करण्यासंबंधी विश्राम गांवकर यांनी काही उपाय योजना शेतकऱ्यांना सांगितल्या. खोड किड्यांसाठी वेळीच उपाय केल्यास काजूची झाडे मरण्यापासून बचावतील असे त्यांनी सांगितले. याशिवाय खोड किड्याची लागण होऊ नये यासाठी कशी काळजी घ्यावी याविषयी सल्ला दिला. काजूच्या झाडाची शास्त्रोक्त पद्धतेने लागवड कशी करावी याचे मार्गदर्शनही त्यांनी केले. विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गांवस यांनी शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांविषयी माहिती दिली. सत्तरी शेतकरी सोसायटीचे संचालक सुरेश गांवकर यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला साधारण शंभर शेतकरी उपस्थित होते.