दुचाकींना तिकीट नाही : अन्य वाहनांना पास योजना
पणजी : नदी परिवहन खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी फेरीबोट सेवेसाठी दुचाकी वाहनांना तिकीट आकारणीचा निर्णय घेतल्यानंतर त्याला राज्यात कडाडून विरोध झाला होता. मात्र काल गुरुवारी सरकारने नमते घेत दुचाकी तिकीट आकारणीचा निर्णय रद्द केला आहे. त्याचबरोबर अन्य वाहनांसाठी केलेली तिकिट दरवाढही मागे घेऊन पास योजना सुरु केली आहे. यासंबंधीची अधिसूचना सरकारने काल जारी केली आहे. नवीन अधिसूचनेनुसार दुचाकी वाहनांसाठी तिकीट रद्द करण्यात आले आहे. तीनचाकी, चारचाकी तसेच व्यावसायिक वाहनांसाठी सवलतीचे दर दिलेले आहेत. याशिवाय तीनचाकी, चारचाकी वाहनांसाठी मासिक पास योजना सुरू करण्यात आली आहे. लहान फेरी मार्गांवर मासिक पासचे शुल्क 315 ऊपये आहे तर लांब पल्ल्याच्या मार्गांसाठी सवलतींसह 450 ऊपयांचा पास आहे.