मंत्री रोहन खंवटे यांचे पर्यटन संचालकांना निर्देश : शॅक मालकांकडून झालेल्या आरोपांची घेतली दखल
पणजी : पर्यटन खात्यातील अधिकारी विनाकारण सतावणूक करून मोठ्या प्रमाणात लाचही मागत असल्याचे शॅक मालकांनी केलेले आरोप गंभीर स्वऊपाचे असून त्याप्रकरणी पोलीस तक्रार दाखल करावी, असे निर्देश पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटन संचालकांना दिले आहेत. शॅक मालक संघटनेचे सचिव जॉन लोबो यांनी केलेल्या आरोपांवरून खंवटे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र सदर आरोप अत्यंत गंभीर स्वऊपाचे असल्याने त्यातील सत्यता उघड करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली पोलीस तक्रार दाखल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर असे आरोप पर्यटन हंगाम संपण्याच्या शेवटच्या दिवशी करण्यात येतात, याबद्दलही खंवटे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
कठोर कारवाई करणार
खरे तर आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शॅक धोरणात अधिक पारदर्शकता आणली आहे. अशावेळी पर्यटन खात्याच्या नावाने एखादी व्यक्ती ’सोपो’ गोळा करत असेल तर त्याबद्दल आम्हाला कळवावे, आम्ही कारवाई करू, असे खंवटे म्हणाले. नवीन धोरणामुळे पर्यटनात कोणताही बेकायदेशीरपणा येणार नाही. तरीही नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाईल.
लोकच देतात शॅक दिल्लीवाल्यांना
विद्यमान सरकार राज्यातील पारंपरिक व्यवसाय दिल्लीवाल्यांच्या हवाली करत असल्याच्या आरोपाचे खंडण करताना मंत्री खंवटे यांनी, सरकारकडून शॅक दिल्लीवाल्यांना देण्यात येत नाहीत, तर स्थानिक लोकच स्वत:च्या नावावर शॅक घेऊन नंतर बेकायदेशीरपणे दिल्लीवाल्यांना चालविण्यास देतात, असा आरोप केला.
तीस टक्के शॅक चालवतात दिल्लीवाले
सध्या राज्यातील 30 टक्के शॅक हे दिल्लीवाले चालवत असल्याचेही ते म्हणाले. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पर्यटन खाते प्रयत्न करत असल्याने काही शॅकमालक त्याना विरोध करतात व उलट त्यांच्यावरच सतावणुकीचे व लाच मागत असल्याचे आरोप करतात, असेही खंवटे म्हणाले. शॅक आणि वॉटरस्पोर्ट्स हे गोव्याचे व्यवसाय असून ते स्थानिकांकडेच राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले.