हलगा येथील जिजामाता महिला मंडळ-ग्रामस्थांची मागणी
वार्ताहर /किणये
अलारवाड क्रॉसनजीकच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्यांमुळे इथली वाहतूक धोकादायक बनली आहे. खड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे अनेक अपघाताच्या घटना घडू लागल्या आहेत. या ठिकाणच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी वाहनधारक व नागरिकांतून वाढलेल्या आहेत. त्यामुळे मंगळवारी हलगा गावातील जिजामाता महिला मंडळ व ग्रामस्थांतर्फे रस्त्यावर थांबून निदर्शने करण्यात आली व या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पुणे -बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग अलारवाड पुलाखालील रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. या या रस्त्यावरून अलारवाड, हलगा, बस्तवाड, कोंडुसकोप, जुने बेळगाव या भागातील वाहनधारकांची रोज मोठ्या संख्येने वर्दळ असते. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूलाच असलेल्या सर्व्हिस रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्याकडे प्रशासन लक्ष कधी देणार असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे मंगळवारी या ठिकाणी महिला व हलगा गावातील नागरिकांनी निदर्शने केली यावेळी अण्णासाहेब घोरपडे, मालन घोरपडे, सुजाता कामाण्णाचे, कल्पना हनुमंताचे, गीता कामाण्णाचे, सरिता येळूरकर, मनीषा कामाण्णाचे, रुपा येळूरकर आदींसह नागरिक उपस्थित होते.
गतिरोधक बसविण्याची मागणी
हलगा गावाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात यावा. अशी मागणीही केली आहे. कारण राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने हलगा , बस्तवाड गावाकडे जाणारा सर्व्हिस रस्ता आहे .या ठिकाणी सुसाट वेगाने वाहने येतात. मात्र गतिरोधक नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. स्थानिक वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी गतिरोधक बसवावेत व अलारवाड क्रॉसनजीकच्या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अन्यथा आम्ही या ठिकाणी भव्य मोर्चा काढणार आहोत अशी माहिती अॅड. अण्णासाहेब घोरपडे यांनी दिली.