मनपाकडून दखल : इमारतींवरील वाढलेली झुडपे काढण्याची मागणी
बेळगाव : रिसालदार गल्ली येथील महानगरपालिकेच्या जुन्या इमारत परिसरात निर्माण झालेला कचरा अखेर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून काढला. या ठिकाणी तहसीलदार कार्यालय असले तरी याची दखल घेण्यात आली नव्हती. अखेर मनपाकडूनच स्वच्छता करण्यात आली. महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये तहसीलदार कार्यालय थाटण्यात आले आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी तालुक्याच्या गावातून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. असे असतानाही या कार्यालयाच्या परिसरातील स्वच्छतेकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले होते. कार्यालयाच्या मागील बाजूला असणाऱ्या खोल्यांमध्ये मद्यपींची सोय झाली होती. त्यामुळे परिसरात कचरा व दारुच्या बाटल्यांचा खच पडला होता.
स्वच्छतागृहांकडे तहसीलदारांचे दुर्लक्ष
अस्वच्छतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. तहसीलदार कार्यालयातील कचरा याच ठिकाणी टाकण्यात येत होता. मात्र कचऱ्याची उचल होत नसल्याने परिसर अस्वच्छ बनला होता. मनपा कार्यालय असताना याठिकाणी स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यांची वेळोवेळी स्वच्छता करून परिसर स्वच्छ ठेवला जात होता. मात्र मनपा कार्यालय नव्या इमारतीत स्थलांतर करण्यात आल्यानंतर या इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. या ठिकाणी तहसीलदार कार्यालय असून सरकारी कामासाठी बाहेर गावावरून आलेल्या नागरिकांसाठी स्वच्छतागृहे उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. असलेल्या स्वच्छतागृहांची देखभाल करण्यात आली नसल्याने ही स्वच्छतागृहे मोडकळीस आली आहेत. याकडे तहसीलदारांनी दुर्लक्ष केले आहे.
अन्यथा इमारतीला धोका उद्भवण्याची शक्यता
कार्यालयाच्या परिसरात निर्माण झालेल्या गैरसोयीबद्दल ‘तरुण भारत’मधून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. याची दखल घेऊन महानगरपालिकेने परिसरातील कचऱ्याची उचल करून स्वच्छता केली आहे. त्यामुळे नागरिक व तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या इमारतीवर झाडे-झुडपे वाढत असून ती वेळीच तोडण्यात यावी, अन्यथा भविष्यात इमारतीला धोका उद्भवण्याची शक्यता आहे.