तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन : 4 लाख गॅलन पाणीपुरवठय़ाची तयारी
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील पाणीसमस्येचे निवारण करण्यासाठी महिलांनी गुरुवारी कॅन्टोन्मेंट कार्यालयातच ठाण मांडले. पाणीसमस्या निवारणासाठी जिल्हाधिकाऱयांशी बोलू, असे कॅन्टोन्मेंट सीईओंनी सांगितले होते. पण जिल्हाधिकारी आणि एल ऍण्ड टीच्या अधिकाऱयांना येथेच बोलवा, अशी भूमिका घेऊन कॅन्टोन्मेंट परिसरातील महिलांनी कार्यालयातच ठाण मांडले. एल ऍण्ड टी कंपनीचे अधिकारी आणि कॅन्टोन्मेंट सीईओ यांची बैठक झाली. या बैठकीनंतर अधिकाऱयांनी सुरळीत पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले.
पाणी बिलाची रक्कम भरणा करण्यात आली नसल्याने कॅन्टोन्मेंटच्या पाणीपुरवठय़ात कपात करण्यात आली होती. याचा फटका कॅन्टोन्मेंट परिसरातील रहिवाशांना बसला. तब्बल 22 दिवस पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने बुधवारी मोर्चा काढण्यात आला होता. ठोस निर्णय झाला नसल्यामुळे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र कॅन्टोन्मेंट कार्यालयात आलेल्या महिलांनी युटर्न घेतला. जिल्हाधिकारी व अधिकाऱयांना येथेच बोलवा, अशी मागणी करून कार्यालयात ठाण मांडले. त्यामुळे एल ऍण्ड टीच्या अधिकाऱयांना कॅन्टोन्मेंट कार्यालयात पाचारण करून कॅन्टोन्मेंटचे माजी सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, बंगलो ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱयांची बैठक झाली.
4 लाख गॅलन पाणीपुरवठा करण्याची तयारी
बिलाच्या समस्येवरून नागरिकांना वेठीस धरू नये, अशी मागणी माजी सदस्य आणि संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केली. त्यामुळे पाणी बिलाबाबत आमदारांच्या समवेत जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन चर्चा करण्यात येईल. पण सध्या सुरळीत पाणीपुरवठा करा, अशी मागणी करण्यात आली. कराराप्रमाणे 8 लाख गॅलन दररोज कॅन्टोन्मेंटला पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे.
सध्या पाणीकपात करण्यात आल्याने केवळ 2 लाख गॅलन पाणीपुरवठा करण्यात येत होता. 4 लाख गॅलन पाणीपुरवठा करण्याची तयारी एल ऍण्ड टीच्या अधिकाऱयांनी दर्शविली. कॅन्टोन्मेंटने यामध्ये वाढ करून दररोज 6 लाख गॅलन पाणीपुरवठा केल्यास कॅन्टोन्मेंट परिसरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करता येईल, असे सांगितले. सध्या पाण्याचा साठा कमी आहे. हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये पावसामुळे पाणी शिरते. त्यामुळे इतका पाणीपुरवठा करणे अशक्मय आहे. शेवटी 4 लाख गॅलन पाणीपुरवठा दररोज करण्याची तयारी एल ऍण्ड टीच्या अधिकाऱयांनी दर्शविली. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन एल ऍण्ड टीच्या अधिकाऱयांनी दिले.
कॅन्टोन्मेंट कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या महिलावर्गाशी चर्चा करण्यात आली व बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे सांगण्यात आले. सुरळीत म्हणजे किती दिवसाआड पाणीपुरवठा करणार? असा मुद्दा महिलावर्गाने उपस्थित केला. त्यामुळे यापुढे पूर्वीप्रमाणेच तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद आणि साहाय्यक कार्यकारी अभियंते सतीश मण्णूरकर यांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डचे आभार व्यक्त करून यापुढे सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी विनंती केली.