संगोळ्ळी रायण्णा रोडवरील खांबांवर बसविले दिवे
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे आणि दुभाजकाचे काम पूर्ण झाल्यानंतर पथदीपांच्या खांबांची उभारणी करण्यात आली होती. पण दिवे लावण्यात आले नव्हते. गेल्या सहा महिन्यांपासून विनादिव्यांचे खांब उभे होते. मात्र अखेर दिवे बसविण्यास मुहूर्त मिळाला असून राणी चन्नम्मा चौक ते किल्ला अशोक चौकापर्यंतचे पथदीप बसविण्यात आले.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरण, फुटपाथ आणि दुभाजक निर्माण करण्यात आले होते. काही रस्त्यांचे काम पूर्ण करून वर्ष उलटले तरी पथदीप सुरू करण्यात आले नव्हते. दुभाजकावर नवीन पथदीपांच्या खांबांची उभारणी करण्यात आली होती. पण दिवे बसविण्यात आले नव्हते. त्यामुळे या खांबांवर दिवे कधी लावणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत होता. शहरातील बहुतांश रस्त्यांवर विनादिव्यांचे खांब उभारण्यात आले होते. सहा महिन्यांपासून दिव्यांची प्रतीक्षा होती. अखेर दिवे बसविण्यासाठी मुहूर्त मिळाला असून राणी चन्नम्मा चौक ते अशोक चौकापर्यंतच्या रस्त्यावर नवीन पथदीप बसविण्यात आले. शुक्रवारी दिवे बसविण्याचे काम सुरू होते.