पंचायत सदस्या राखी नाईक प्रभुदेसाई यांची सरकारकडे मागणी : झाड कोसळून मृत्यूस प्रशासकीय यंत्रणेचा निष्काळजीपणा कारणीभूत
प्रतिनिधी /सांगे
तीन दिवसापूर्वी सांगे येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून प्रशासकीय यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप अनिता फर्नांडिस हिचा बळी गेला. तिचा अकाली मृत्यू झाल्यामुळे आज दोन मुले आईविना पोरकी झाली आहेत. शासनाने तिच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी तसेच तिच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी नेत्रावळी पंचायत सदस्या व तृणमूलच्या सरचिटणीस राखी नाईक प्रभुदेसाई यांनी सांगे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
गुलमोहराच्या झाडाने अनिताचा बळी घेतला. 2021 साली वन खात्याने हे झाड धोकादायक बनल्याने कापण्यासाठी शिफारस केली होती. आपत्ती व्यवस्थापनाखाली ते कापता आले असते. पण प्रशासकीय यंत्रणेकडून दुर्लक्ष झाले. त्यामुळे याबाबतीत दोषी असलेल्या व्यक्ती व अधिकाऱयांविरुद्ध खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नाईक यांनी केली आहे.
स्वतंत्र अग्निशामक दलाची गरज
सांगे हा भौगोलिकदृष्टय़ा मोठा तालुका असल्याने स्वतंत्र अग्निशामक दलाची नितांत गरज आहे. सध्या कुडचडेतील अग्निशामक दलावर अवलंबून राहावे लागते. पावसाळ्यात तर सेवा वेळेवर उपलब्ध होत नाही. त्यामुळे सरकारने सांगे येथे त्वरित अग्निशामक दलाचे स्थानक सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. अनिताच्या मृत्यूची घटना काळजाला वेदना देणारी आहे. आज तिचे पती, मुले व संपूर्ण कुटुंब खचले आहे. मृत्यू आलेला माणूस परत येऊ शकत नाही. तिला श्रद्धांजली दिली आणि विषय संपला असे होता कामा नये, असे नाईक म्हणाल्या.
सदर गुलमोहराचे झाड उन्मळून पडले. त्याच्या मुळाचा भाग जर पहिला, तर ते पोखरल्याचे दिसून येते. पण हे झाड कापण्याची तसदी प्रशासकीय यंत्रणेने घेतली नाही. त्यामुळे एका महिलेचा नाहक बळी घेला. योग्य वेळी सदर झाड कापण्याचा निर्णय झाला असता, तर हा प्रसंग ओढवला नसता, असे त्या म्हणाल्या. सांगे तालुक्यातील रस्त्यांच्या बाजूची तसेच पालिका आणि पंचायत क्षेत्रातील धोकादायक झाडे कापण्यात यावीत किंवा त्यांच्या फांद्यांची छाटणी करण्यात यावी, अशी मागणी देखील नाईक यांनी केली. त्याचबरोबर धोकादायक झाडे कापण्यासंदर्भातील जे अर्ज प्रशासकीय पातळीवर पडून आहेत ते निकालात काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
माणुसकीच्या नात्याने आम्ही मयत अनिताच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्याचा विषय पुढे नेऊ. यासंदर्भात राज्यपाल, मुख्यमंत्री, स्थानिक आमदार, सरकारी अधिकारी यांना सोमवारी निवेदन सादर करण्यात येईल, अशी माहिती नाईक यांनी दिली.