ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एका वृद्ध दाम्पत्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना नोटीस धाडली आहे. गावित यांनी 2019 ची निवडणूक लढविण्यासाठी या दाम्पत्याकडून 15 लाख रुपये उसने घेतले होते. ते परत न केल्याने या दाम्पत्याने गावित यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली होती. मात्र, पोलीस सहकार्य करत नसल्याने या दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
रोहिंटन तारापोरवाला (वय 76) आणि होमाई तारापोरवाला (वय 74) असे फसवणूक झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य जयेंद्र डुबला यांच्यामाध्यमातून राजेंद्र गावित यांनी तारापोरवाला दाम्पत्याकडून 2019 साली निवडणूक लढवण्यासाठी 15 लाख रुपये उसने घेतले होते. निवडणूक लढविल्यानंतर हे पैसे परत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. गावितांनी तारापोरवाला दाम्पत्याला पोस्ट डेटेड चेकही दिला. परंतु, लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर गावित तारापोरवाला दाम्पत्याला टाळू लागले. ऑक्टोबर 2019 मध्ये गावित यांनी दिलेला चेकही बाऊन्स झाला.
अधिक वाचा : राऊतांना ‘ते’ ट्विट भोवलं; बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चेक बाऊन्स झाल्यानंतर तारापोरवाला दाम्पत्याने गावित यांना कायदेशीर नोटीस पाठवली. तेव्हा राजेंद्र गावित यांनी तारापोरवाला यांना 9 लाख रुपये दिले. मात्र, उर्वरित पैसे देण्यास राजेंद्र गावित यांनी नकार दिला. त्यामुळे या दाम्पत्याने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली.