गुजरातमधील दुर्घटना : सुदैवाने जीवितहानी टळली
वृत्तसंस्था/ वलसाड
गुजरातमधील तिऊचिरापल्ली ते श्री गंगानगर दरम्यान धावणाऱ्या हमसफर एक्स्प्रेसच्या एका बोगीमध्ये शनिवार, 23 सप्टेंबर रोजी आग लागली. रेल्वेला आग लागल्याचा व्हिडिओ समोर आला असून रेल्वेमधून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे त्यात दिसत आहे. आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे. गुजरातमधील वलसाड जिह्यात ही घटना घडल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वे क्रमांक 22498 च्या पॉवर कार/ब्र्रेक व्हॅन कोचमध्ये आग लागल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ सुमित ठाकूर यांनी दिली. यानंतर शेजारील डब्यातील सर्व प्रवाशांना तात्काळ सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच आग लागलेली बोगी मुख्य रेल्वेपासून वेगळी करून आग अन्यत्र पसरणार नाही याची काळजी घेण्यात आली. मुख्य रेल्वेपासून डबा वेगळा केल्यानंतर काही वेळाच्या विलंबाने एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आली. या आगीच्या दुर्घटनेमुळे काही रेल्वेंचे वेळापत्रक कोलमडले होते.