प्रतिनिधी /म्हापसा
करासवाडा-म्हापसा येथील जंक्शनजवळ असलेल्या गाळेवजा दुकानाला सोमवारी रात्री 10.30 वा. लागलेल्या आगीत सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. हा गाळा दिनेश हरमलकर यांच्या मालकीचा होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले.
सदर गाळा लाकडी असल्याने आगीने लगेचच पेट घेतला. त्यात किराणाचे सामान जास्त होते. बहुतेक सामान नष्ट झाले. आगीत गाळा जळून राख झाला होता. सुमारे 10 हजार रुपयांची मालमत्ता वाचविण्यात त्यांना यश मिळाले. आगीचे कारण निश्चित होऊ शकले नाही. दलाचे उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत तसेच इतरांनी आगीवर नियंत्रणास भूमिका बजावली.
घटनेची माहिती मिळाल्यावर शेजारील नागरिक सिद्धार्थ हरमलकर, समीर हरमलकर, शैलेश हरमलकर, नितेश हरमलकर, प्रितम बांदोडकर, सचिन गावडे यांनी आजूबाजूच्या घरातील बादली, घागरींच्याच्या साहाय्याने पाणी आणून आग विझविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. मात्र आगीने मोठा पेट घेतल्याने आग त्यांना आटोक्यात आणणे कठीण झाले. वाऱयाने आग सर्वत्र पसरली. अग्निशमन दलाच्या बंबास येण्यास उशीर झाल्याने दुकान पूर्णतः जळून खाक झाल्याचा आरोप यावेळी या युवकांनी केला.