अगीत तीस झोपड्या पूर्णत: जळून खाक : पंधरा सिलिंडरांचा स्फोट, सत्तर सुरक्षित,रोख, दागिने, वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी,लोक बाहेर पडल्यामुळे जीवित हानी टळली
म्हापसा : आगरवाडा कळंगुट येथील आगीत 30 झोपड्या पूर्णत: भस्मसात झाल्या. तसेच 70 हून अधिक झोपड्यांना आगीची झळ पोहोचली. काल रविवारी दुपारी 1 वा. ही घटना घडली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र यामध्ये स्वयंपाकाच्या 15 सिलिंडरांचा स्फोट झाला. त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली, अशी माहिती वस्तीतील लोकांनी दिली. आगीची माहिती मिळताक्षणी म्हापसा, पिळर्ण, पणजी, पर्वरी येथील अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी बंब व जवानांच्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तासांच्या प्रयत्नांनतर आग आटोक्यात आणण्यास यश आले. या झोपडपट्टीतून सुमारे 70 सिलिंडर बाहेर काढण्यात आले. यावेळी आग विझविण्याचा प्रयत्न करताना एकजण भाजून जखमी झाला. त्याला प्रथम आझिलोत दाखल केले, नंतर पुढील उपचारासाठी गोमेकॉत पाठविले, अशी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी कृष्णा पर्रीकर यांनी दिली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
45 जवानांकडून तीन तास आगीशी झुंज
विविध अग्निशामक केंद्रांचे 45 जवान या आगीवर नियंत्रण राखण्यासाठी प्रयत्न करत होते. जीवाची पर्वा न करता झोपडपट्टीतील गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात यशस्वी झाले. त्यांना स्थानिक लोकांनीही या कामासाठी सहकार्य केले.
सिलिंडरच्या स्फोटामुळे आग भडकली
आगरवाडा कळंगुट येथे अत्यंत दाटीवाटीने असलेल्या झोपड्यांमधील एका झोपडीत प्रथम सिलिंडरचा स्फोट झाला. त्याच्या झळा शेजारच्या झोपड्यांना लागल्यामुळे अन्य सिलिंडरांचा स्फोट होऊन आगीने रुद्रावतार धारण केला. तरीही जवानांनी झोपटपट्टीत घुसून अनेक सिलिंडर हटविले. याठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरांचा मोठा बेकायदेशीर साठा असल्याचे आढळून आले. एका झोपडीतर चार ते पाच सिलिंडर होते.या पत्र्याच्या कच्च्या स्वरुपाच्या झोपड्या आहेत. यामध्ये सुमारे 250 लोक राहत असल्याची माहिती प्राप्त झाली. आगीची माहिती मिळता येथील सर्व लोकांनी जीव वाचविण्यासाठी बाहेर धाव घेतली. त्यामुळे जीवित हानी झाली नाही. तसेच काहींनी आपापले सामान झटपट बाहेर काढले.
तीन लाखांची रोकड, दागिने भक्ष्यस्थानी
झोपटपट्टीला लागलेल्या आगीत आपल्या घरातील सुमारे तीन लाख रुपयांची रोकड खाक झाली, हे पैसे आपल्या मुलीच्या लग्नासाठी आपण मेहनतीने जमवून ठेवले होते, अशी माहिती एका रहिवाशाने दिली. याशिवाय अनेक जणांच्या मौल्यवान वस्तू, रोख रक्कम व सोन्याचे दागिनेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले, अशी माहिती तेथील रहिवाशांनी दिली. ही झोपडपट्टी दाटीवाटीने असल्यामुळे अग्निशामक दलाला बंब घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणांचा सामाना करावा लागला. त्यामुळे सुमारे 200 मीटर दूर राहूनच बंबाला मोठा पाईप जोडून आगीवर फवारा मारावा लागला. या परिसरात तीन विहिरी आहेत. त्यातील पाणी बादल्यांचा वापर करून स्थानिकांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी सहकार्य केले. मात्र आगीचा भडका मोठा असल्याने आग सहजासहजी आटोक्यात आणणे मुश्किल बनले होते. अखेर अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. अग्निशामक दलाचे उपविभागीय अधिकारी बॉस्को फेर्राव, म्हापसा दलाचे कृष्णा पर्रीकर यांनी घटनास्थळी उपस्थित जवानांना मार्गदर्शन केले. झोपडपट्टीच्या बाजूला पार्क करून ठेवलेली स्प्लेंडर दुचाकीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. स्थानिक पंचायत मंडळाने घटनास्थळाची पाहणी केली.