वार्ताहर/ लोटे
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील डिवाईन केमिकल कंपनीमध्ये रविवारी सकाळी 10.30 वाजता फॅब्रीकेशनचे काम चालू असताना ठिणगी उडून सॉल्वंटच्या ड्रमला आग लागून भडका उडाल्याने 7 कामगार जखमी झाले. त्यातील तिघांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना ऐरोलीतील एका हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
या आगीत संदीप गुप्ता (30), अदिश मोरया (40), भिपलाप मंडल (35), दिलीप शिंदे, विनयकुमार मोरया, दीपक महाडिक, मयूर खाके अशी जखमींची नावे असून यातील संदीप, अदिश व भिपलाप यांची प्रकृती गंभीर आहे. कंपनीत सकाळच्या सुमारास फॅब्रीकेशनचे काम सुरू असताना ठिणगी उडून ती सॉल्वंटच्या ड्रमला लागल्याने त्या ठिकाणी आगीचा भडका उडाला. या भडक्यात 7 कामगार जखमी झाले. जखमी कामगारांना प्राथमिक उपचारासाठी घाणेखुंट येथील परशुराम रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यातील तिघा कामगारांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना ऐरोली येथील एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तर उर्वरित चौघांना प्राथमिक उपचारानंतर चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या दुर्घटनेची माहिती कंपनी व्यवस्थापनाकडून कोल्हापूर येथील औद्योगिक सुरक्षा विभागाला देण्यात आली नव्हती. मात्र, घटनास्थळावरील काही नागरिकांनी कोल्हापूर येथे संपर्क साधून घटनेची माहिती दिली असता विभागाचे अधिकारी जोशी, सहसंचालक बिनताडे यांनी सायंकाळी कंपनीला भेट देवून पाहणी केली. यावेळी अधिकाऱयांना जाब विचारले असता ज्या ठिकाणी घटना घडली, तेथे असणारे कामगार रूग्णालयात असून त्यांचा जबाब घेतल्यानंतर पुढील माहिती मिळेल, असे सांगून कंपनी व्यवस्थापनाकडून या बाबत कोणतीच माहिती देण्यात आली नसल्याचेही स्पष्ट केले.
घटनास्थळी पोलीस बंदोबस्त
या दुर्घटनेनंतर परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी घटनास्थळी पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. येथील नायब तहसीलदार सिनकर, जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक यांनीही कंपनीला भेट देवून पाहणी केली.