वारणानगर प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील देवाळे येथील भारत चव्हाण या तरुणाचा कोडोली येथील श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीत एक डोळा निकामी झाला. पाईप मध्ये लावलेला सुतळी बॉम्ब फुटला का नाही हे पाहत असताना अचानक सुतळी बॉम्ब फुटल्याने ही घटना घडली.औषधी फटाक्यातील विषारी द्रव्यामुळे इन्फेक्शन झाल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च आहे, तो करणार कसा असा त्याच्या कुटुंबापुढे आवासून प्रश्न उभा राहिला आहे.
भारत चव्हाण याच्यावर वेळेत उपचार व्हावेत यासाठी कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु केले आहेत. कोडोलीतील तरुण मंडळे कर्तव्य भावनेने मदत गोळा करण्यासाठी पुढे सरसावली आहेत. तर अनेक तरुण स्वतःहून मदत करायला पुढे येत आहेत.
कोल्हापूरातील खाजगी रुग्णालयात रविवार दि.१ ऑक्टोबर रोजी पारनेर चे आमदार निलेश लंके यानी भेट देऊन भारत चव्हाण याच्या प्रकृतीची विचारपूस करून कुंटूंबाला आधार दिला. वास्तविक घटना घडल्या पासून दोन दिवस उलटले तरी स्थानिक लोकप्रतिनिधी स्तब्धच राहिले आहेत. नेत्यांनी तातडीने मदतीला पुढे येण्याची गरज होती अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.