नावेली-मडगावात घेतले प्रशिक्षण : 1422 अग्निवीरांचा दीक्षांत सोहळा,गोव्यातील एकाचाही समावेश नाही
मडगाव : केंद्र सरकारने गेल्या वर्षापासून भारतीय संरक्षण दला ‘अग्निवीर’ योजना सुरू केली असून या योजनेखाली 1,422 अग्निवीरांची देशातील पहिली तुकडी सैन्यात दाखल होण्यास सज्ज झाली आहे. या अग्निवीरांचे प्रशिक्षण नावेली-मडगाव येथील ‘थ्री मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंट’मध्ये 31 जुलै रोजी पूर्ण झाले आहे. काल बुधवारी त्यांचा दीक्षांत सोहळा शानदाररित्या संपन्न झाला. अग्निवीर योजना जाहीर झाल्यानंतर देशाच्या विविध भागांतून आलेल्या 1,422 युवकांना 1 जानेवारीपासून गोव्यात प्रशिक्षण दिले जात होते. अग्निवीर योजनेंतर्गत युवकांना भारतीय लष्करामध्ये भरती होता येते. या भरतीमध्ये अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन, म्युनिशन, एक्झामिनर), अग्निवीर क्लार्क-स्टोअर किपर, अग्निवीर ट्रेडसमन जनरल व अग्निवीर ट्रेडसमन टेक्निकल अशा पदांचा समावेश आहे. अग्निवीर योजनेंतर्गत अर्ज केलेल्या देशातील विविध भागातील युवकांच्या निवड चाचणीची सुरवात नावेली येथील थ्री मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंट परिसरात गेल्यावर्षी सुरू झाली होती. अग्निवीरांची भारतीय सैन्यात एका वेगळ्या रँकवर नियुक्ती केली जाणार आहे. जी विद्यमान रँकपेक्षा वेगळी असणार असून भरती झालेल्या युवकांपैकी 75 टक्के सैनिक चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होतील तर 25 टक्के सैनिकांना कायमस्वरूपी जागांवर सामावून घेतले जाणार आहे. नावेली येथे मिलिटरी कॅम्पमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी दीक्षांत परेड झाली. यावेळी चांगली कामगिरी केलेल्या प्रशिक्षणार्थिना गौरविण्यात आले.
गोव्यातील एकाही युवकाचा समावेश नाही
केंद्र सरकारने गेल्या वर्षी जी जेव्हा अग्निवीर योजना घोषित केली, त्यावेळी तिची बरीच चर्चा झाली होती. अग्निवीरांच्या या पहिल्या तुकडीला गोव्यात प्रशिक्षण मिळाले. परंतु, त्यात एकाही गोव्यातील युवकाचा समावेश नव्हता.