वृत्तसंस्था /रोम
पहिल्यांदाच मंगळ ग्रहावरून पृथ्वीवर सिग्नल पाठविण्यात आला आहे. हा सिग्नल एखाद्या परग्रहवासीयाने नव्हे तर युरोपीय अंतराळ संस्थेच्या एक्सोमार्स ट्रेस गॅस ऑर्बिटरने पाठविला आहे. हे सिग्नल मंगळ ग्रहाच्या कक्षेत फिरणाऱ्या टीजीओने 24 मे रोजी रात्री 9 वाजता पाठविले, जो 16 मिनिटांनी पृथ्वीवर रिसिव्ह झाला आहे. हा प्रयोग ‘ए साइन इन स्पेस’ प्रकल्पाच्या अंतर्गत करण्यात आला आहे. अन्य ग्रह किंवा एक्स्ट्राटेरेस्ट्रियल सिव्हिलायझेशन (एलियन्स)मधून पृथ्वीवर एखादा सिग्नल पाठविण्यात आल्यास तो आम्ही रिसिव्ह करू शकू की नाही, हे जाणून घेणे हा या प्रयोगामागील उद्देश होता. टीजीओवरून पाठविण्यात आलेल्या सिग्नलला व्हर्जिनियाच्या ग्रीन बँक टेलिस्कोप, इटलीतील मेडिसिना रेडिओ एस्ट्रोनॉमिकल स्टेशन, कॅलिफोर्नियातील एलन टेलिस्कोप ऐरे आणि न्यू मेक्सिकोतील व्हेरी लार्ज ऐरने रिसिव्ह केले होते. आम्ही नेहमीच शक्तिशाली आणि परिवर्तनकारी घटनांचा अर्थ शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल सिव्हिलायझेशनकडून सिग्नल किंवा मेसेज मिळणे मनुष्यासाठी परिवर्तनकारी अनुभव ठरणार असल्याचे उद्गार सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रियल इंटेलिजेन्स इन्स्टीट्यूटचे वैज्ञानिक आणि ‘ए साइन इन स्पेस’ प्रकल्पाचे प्रमुख डेनिएला डी पॉलिस यांनी काढले. डी पॉलिस यांनी आंतरराष्ट्रीय तज्ञ आणि अंतराळ संशोधकांच्या स्वत:च्या टीमसोबत मिळून मंगळ ग्रहावरून मिळालेल्या या सिग्नलला डीकोड करण्यासाठी लोकांकडून मदत मागितली आहे. डिकोडिंगच्या प्रक्रियेतून अखेर पृथ्वीवर पाठविण्यात आलेल्या सिग्नलमध्ये काय आहे हे समजणार असल्याचे त्यांचे सांगणे आहे. डी पॉलिस आणि त्यांच्या टीमने या सिग्नल किंवा मेसेजला डीकोड करण्यासाठी एक प्रकल्प हाती घेतल्याचे सांगण्यात येत आहे.