पिंपरी, पुणे / प्रतिनिधी :
कोरोना प्रादूर्भावानंतर आता (H3N2) न्युमोनियाच्या नवीन विषाणूचे संकट आले आहे. या विषाणूमुळे भोसरीतील ७३ वर्षीय वृद्धाचा गुरुवारी (दि. १६) उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर, या विषाणुची शहरातील तीन जणांना लागण झाली होती. हे तीनही रुग्ण बरे झाले आहेत. सद्यस्थितीत शहरात एकही बाधित रुग्ण नाही.
भोसरीतील एका ७३ वर्षीय पुरुषाला H3N2 न्युमोनियाच्या विषाणूची लागण झाली होती. त्यांना ७ मार्च रोजी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. हा H3N2 या विषाणुचा शहरातील पहिला बळी ठरला आहे. त्यांना या विषाणुबरोबरच फुफ्फुस आणि हृदयाचा आजार होता. H3N2 विषाणूने बाधित रुग्णांसाठी वायसीएम, नवीन जिजामाता, भोसरी, थेरगाव आणि आकुर्डी या पाच रुग्णालयात प्रत्येकी दहा खाटांचे आयसोलेशन वार्ड तयार करण्यात आले आहेत.
अधिक वाचा : राज्याला पुन्हा अवकाळीचा तडाखा
दरम्यान, H3N2 या नवीन विषाणुस कोणीही घाबरुन नये. हा आजार स्वाईन फ्ल्यु सारखाच आहे. या आजारावरील औषधे महापालिकेकडे उपलब्ध आहेत. या आजाराने बाधित रुग्णांवरील उपचारासाठी यंत्रणा तयार आहे. लोकांनी सर्दी, खोकला, ताप, घसादुखी अंगावर काढू नये. ही लक्षणे असल्यास महापालिकेच्या जवळच्या रुग्णालयात जावे. वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यावा. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्कचा वापर करावा, असे पिंपरी महापालिकेचे वैद्यकीय विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.