194 तलावांची निवड, मत्स्य पालनाला प्राधान्य, तलावांची माहिती मागविली
बेळगाव : जिल्ह्यातील 485 ग्रामपंचायत अखत्यारितील 194 तलावांमध्ये मत्स्य पालन केले जाणार आहे. पंचायतराज आणि मत्स्य पालन विभागामार्फत ग्रामपंचायतचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. शिवाय मत्स्य पालन आणि विक्रीची जबाबदारी संबंधित पंचायतींवर राहणार आहे. मत्स्यशेती सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. यानुसार संबंधित तलावांची माहिती मागविण्यात आली आहे. शासनाकडून मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एकूण 485 ग्रा. पं. मध्ये 600 हून अधिक तलाव आहेत. यामध्ये रोजगार हमी योजनेतील तलावांची भर पडली आहे. या तलावांमध्ये मत्स्य बीज सोडून मत्स्य पालनासाठी प्रयत्न होणार आहेत. याबरोबरच नापीक जमिनीत तलाव उभारून मत्स्य पालनाला प्राधान्य दिले जाणार आहे.
नापीक क्षेत्रात तलाव निर्मिती
विशेषत: जिल्ह्यातील कृष्णा, घटप्रभा आणि मलप्रभा नदीकाठावरील हजारो एकर क्षेत्र नापीक बनले आहे. अशा नापीक जमिनीत रोजगार हमी योजनेतून खोदाई केली जाणार आहे आणि लहान तलावांची निर्मिती करून मत्स्य पालन केले जाणार आहे. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून अलीकडे शेळी पालन, कुक्कुट पालन आणि मत्स्य पालनाकडे नागरिकांचा ओढा वाढू लागला आहे. निवड करण्यात आलेल्या तलावांमध्ये मत्स्यशेती सुरू झाल्यास संबंधित ग्राम पंचायतींच्या उत्पन्नात भर पडणार आहे. अलीकडे रोजगार हमी योजनेंतर्गत नवीन तलावांची खोदाई झाली आहे. त्यामुळे मत्स्य पालन करणे सोयीस्कर होणार आहे. मात्र, यंदा पावसाअभावी काही तलाव कोरडे पडले आहेत. त्यामुळे मत्स्य शेतीसमोर अडचणी येणार आहेत.
देखभालीची जबाबदारी ग्रा.पं.वर
जिल्ह्यात 194 तलावांची निवड करण्यात आली आहे. या तलावांमध्ये मत्स्य बीज सोडून मत्स्यशेती केली जाणार आहे. संबंधित ग्राम पंचायतींवर देखभालीची जबाबदारी राहणार आहे. मत्स्य शेतीतून मिळणारे उत्पन्न ग्रामपंचायतींना मिळणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
– वसंत हेगडे (सहसंचालक, मत्स्य खाते)