मासेमारीला 1 ऑगस्टपासून सुऊवात : हंगामाची जोरदार तयारी
कारवार : मासेमारी हंगामाला 1 ऑगस्टपासून सुऊवात होणार आहे. हंगाम सतरा-अठरा दिवसांवर येऊन ठेपल्याने मच्छीमारबांधव हंगामाच्या जोरदार तयारीला लागले आहेत. जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील कारवार, अंकोला, कुमठा, होन्नावर आणि भटकळ या पाच तालुक्यात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. या व्यवसायावर किनारपट्टीवरील हजारो कुटुंबे अवलंबून आहेत. यापैकी काही कुटुंबे प्रत्यक्षरित्या तर काही कुटुंबे अप्रत्यक्षरित्या अवलंबून असतात. मासेमारी व्यवसायामुळे मच्छीमारीच्या ऐन हंगामात प्रत्येक दिवशी कोट्यावधीची उलाढाल होत असते. काही मच्छीमारीबांधव हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीने तर काही मच्छीमारी यांत्रिक होडीद्वारे खोल समुद्रात उतरून आधुनिक पद्धतीने करतात. मासळी उत्पादनाच्या प्रमाणात होणारी घट ही चिंतेची बाब बनून राहिली आहे. समुद्रातील वातावरणाच्या लहरीपणामुळे गरीब मच्छीमारी समाजाची मोठी पंचाईत होत आहे. कारवार आणि अंकोला तालुक्यातील काही समुद्रकिनारे सी-बर्ड प्रकल्प उभारणीसाठी भारतीय संरक्षण खात्याने ताब्यात घेतल्याने या समाजाच्या अडचणीत भर पडली आहे. कारवारजवळचा अरबी समुद्र बांगडा या जातीच्या मासळीसाठी प्रसिद्ध आहे. तथापि सीबर्ड प्रकल्पामुळे बागडा मासळी प्रचंड प्रमाणात मिळणाऱ्या समुद्र प्रदेशात संरक्षण खात्याने मच्छीमारीवर बंदी घातली आहे. त्यामुळे कारवार तालुक्यातील मच्छीमारी बांधवांच्या अडचणीत भर पडली आहे.
जाळी दुऊस्तीच्या कामात व्यस्त
येथील आरटीओ कार्यालयापासून लंडन ब्रिजपर्यंत सुमारे एक किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय हमरस्ता क्र. 66 वर फ्लायओव्हर बांधण्यात आला आहे. फ्लायओव्हरच्या खाली भरपूर मोकळी जागा आहे. या जागेवर जाळ्यांचे मोठमोठे ढीग ठेवण्यात आले आहेत. याच जागेवर शेकडो मच्छीमारी बांधव नवीन जाळी विणण्यात, जाळ्यांची दुऊस्ती करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत.
1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीवर बंदी
प्रत्येक वर्षी सरकारी नियमानुसार 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत यांत्रिक होडीद्वारे मासेमारीवर बंदी असते. या कालावधीत मच्छीमारी समाज होड्यांची डागडुजी, रंगरंगोटी, जाळ्यांची दुऊस्ती, नवीन जाळी विणने आदी कामे करून घेतात. काही मच्छीमार याच कालावधीत नवीन होड्या, जाळी खरेदी करतात. जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील होड्यावर काम करण्यासाठी उत्तरप्रदेश, बिहार, ओडिशा आदी राज्यातील मजूर हंगाम तोंडावर येताच किनारपट्टीवर दाखल होतात.