कुरळप प्रतिनिधी
वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक, लाडेगाव येथी घोल नावाच्या शिवारातील विहीर पडलेल्या बिबट्याला वन विभागाने पाच तासांच्या अथक प्रयत्नांनी बाहेर काढले. क्रेन आणि पिंजऱ्याच्या सहाय्याने त्याला जीवदान देण्यात आले. भक्षाच्या शोधात हा बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज आहे.
जयसिंग बापू पाटील,आप्पासो नेमगोंडा पाटील-शिरोटे यांची ही विहीर असून गुरुवारी रात्री विहिरीत बिबट्या पडला होता.सकाळी विहिरीवरील विद्युत मोटर सुरु करण्यासाठी गेल्यानंतर संबंधित शेतकऱ्यास बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले. संबंधित शेतकऱ्याने वनविभागाला कळवले.वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी उपस्थित झाले. यामध्ये रेंजर महनतेज भगले, भगवान गायकवाड निवास ऊगळे, अनिल पाटील,भिवा कोळेकर, अश्विनी वाघमारे,विशाल डुबल, शहाजी पाटील यांच्यासह वन विभागाच्या कर्मचारी यांचा समावेश होता.
क्रेनच्या साहाय्याने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याचे व वाचवण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले. त्याला सुखरुप विहिरीतून बाहेर काढण्यात सुमारे पाच तास लागले. दरम्यान परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती. कुरळप पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी देखील उपस्थित होते.अंदाजे सहा महिन्याचा बिबट्या असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
ऐतवडे बुद्रुक सह,ढगेवाडी, कार्वे, शेखरवाडी, लाडेगाव, इटकरे, येडेनिपाणी, कुरळप परिसरात अनेक वेळा बिबट्याच्या हल्यात शेळ्या मेंड्या, कुत्री, जनावरे इत्यादी वर हल्ले झाले आहेत. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण आहे. या भीतीने रात्री शेताला पाणी देण्यास जाण्याचे धाडस शेतकरी करेना झालेत. विहिरीत बिबट्या दिसल्याने परिसरात भीती अधिकच वाढली आहे.