पणजी पोलिसांची यशस्वी कामगिरी : ‘कॅसिनो कनेक्शन’मधून खंडणी-अपहरण,पीडित तसेच संशयितही बिगरगोमंतकीय,संशयितांमध्ये दोन महिलांचाही समावेश
प्रतिनिधी /पणजी
युवकाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडून 70 लाख रुपये खंडणी मागून त्या युवकाला करंजाळे-ताळगाव येथील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवून जबर मारहाण केल्याप्रकरणी पणजी पोलिसांनी घटनेच्या अवघ्या 20 मिनिटांतच पाचही संशयितांना अटक करून त्या युवकाची सुटका केली. संशयितांमध्ये दोन महिला आहेत. या गुन्हय़ातील युवक आणि पाचही संशयित बिगरगोमंतकीय असून ‘कॅसिनो कनेक्शन’मुळे हा गुन्हा घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये अंतरिक्ष सिंग (33), अंबर सिंग (34, दोघेही पटणा बिहार येथील आहेत), वरद मुंदडा (30 जालना महाराष्ट्र), मोनिका प्रिया (31 मूळ बिहार येथील असून सध्या बेंगळुरु येथे राहते), जिओदा (29, उज्बेकिस्थान) यांचा समावेश आहे.
बिगरगोमंतकीय असलेले पीडित आणि संशय़ित हे नियमित पॅसिनोत जाणारे असून जुगाराच्या प्रकरणातून अपहरण करून खंडणी मागण्याचे प्रकरण घडले असल्याचेही पोलिसांनी सांगितले. संशयितांच्या विरोधात भादंसं 365, 364(ए), 342 व 506(2) कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. संशयितांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
पॅसिनोत खेळण्यासाठी घेतले लाखो रुपये
याबाबत पीडित युवक दीपककुमार दीनानाथ केशरी (मूळ मुंबई येथील, गेल्या काही महिन्यांपासून ताळगाव येथे राहणारा) याने तक्रार दाखल केली आहे. दीपक व संशयित हे सर्वजण एकमेकांच्या ओळखीचे आहेत. सर्वांचे कॅसिनो कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. अंबर सिंग हा विदेशात नोकरीला असून त्याच्या ताळगाव येथील फ्लॅटमध्ये दीपक केशरी भाडय़ाने राहत होता. अधुनमधून संशयित गोव्यात आल्यानंतर नियमित पॅसिनोत जुगार खेळायला जात होते. दीपक कॅसिनोत जुगार खेळण्यात पारंगत होता आणि तो खेळायला त्याला संशयित पैसे पुरवित होते. दीपकने सर्व संशयितांकडून लाखो रुपये घेतले होते. व्याजासह सर्व पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते. जुगारात पैसे हरत असल्याने त्यांचे पैसे परत करणे त्याला कठीण बनले होते.
सत्तर लाख रुपयांची मागितली खंडणी
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कित्येकवेळा मागूनही दीपककडून पैसे मिळत नसल्याने पाचही संशयितांनी सोमवार 6 जून रोजी पहाटे दीपकचे ताळगावहून अपहरण केले. करंजाळे येथील फ्लॅटमध्ये त्याला डांबून ठेवले. जबर मारहाणही केली. घेतलेले पैसे आत्ताच्या आत्ता देण्याची व्यवस्था कर, अशी धमकी दिली. त्याला मारहाण करताना व्हिडिओही काढला, तसेच त्याच्या घरी फोन करून 70 लाख रुपयांची खंडणी मागितली.
पणजी पोलिसांनी वीस मिनिटांत लावला छडा
दीपकने संशयितांच्या तावडीतून सुटण्यासाठी पैशांची व्यवस्था करण्यासाठी फोन भावाला करीत असल्याचे सांगून भावाला मॅसेज पाठविला व सारा प्रकार कळविला. आपली सुटका करण्याची विनंती केली व मोबाईल लोकेशनही पाठविले. त्याच्या भावाने त्वरित गोव्यात फोन करून आपल्या मित्राला ही बातमी दिली. नंतर त्या मित्राने 100 डायल करुन गोवा पीसीआर पोलिसांना कळविले. पणजी पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी अवघ्या 20 मिनिटांच्या आत पाचही संशयितांना अटक करून पीडिताची सुटका केली.