जमीन अतिक्रमण भोवले, राष्ट्रवादीला जोरदार धक्का, राजकीय क्षेत्रात खळबळ
सावळज प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील डोंगरसोनी, ता. तासगाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचासह पाच सदस्यांवर अपात्रेची कारवाई करण्यात आली आहे. वन जमीन अतिक्रमण प्रकरणात सांगली जिल्हाधिकारी डाॅ. राजा दयानिधी यांनी या मोठ्या कारवाईचा निर्णय दिला आहे. एकाच वेळी पाच सदस्यांवर अपात्रेची कारवाई झाल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून डोंगरसोनीत राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का बसला आहे.
ग्रामपंचायत सदस्यांनीच अतिक्रमण केल्याची तक्रार करीत सांगली जिल्हाधिकारी यांचेकडे गुलाब नामदेव सुर्यवंशी यांनी विवाद अर्ज दाखल केला आला होता. त्यांचा अर्जावरून कागदपत्रे तपासून राष्ट्रवादीचे सरपंच राणी विलास झांबरे, अजय शंकर मोहीते, सुनिता राजाराम झांबरे, सुधाकर संभाजी शिंदे, शितल विनायक बोडके या ग्रामपंचायत सदस्यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनीयम १९५८ चे कलम १६ व १४ (१)(ज ३) प्रमाणे अपात्र करणेचा निर्णय दिला आहे. या सदस्यांना वन जमीन अतिक्रमण प्रकरण भोवले असुन पाच सदस्य अपात्र झाले आहेत.
सुमारे दोन वर्षापूर्वी डोंगरसोनी ग्रामपंचायतीची सार्वत्रीक निवडणुक झाली होती. यावेळी १३ सदस्य पैकी राष्ट्रवादीचे १० सदस्य बिनविरोध निवडुन आले होते, त्यातील तीन जागांची निवडणुक लागली होती. त्या तीन जागी भाजपचे सदस्य निवडुन आले होते. डोंगरसोनी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे सरपंचासहीत ५ सदस्य अपात्र झाल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.