पुणे / प्रतिनिधी :
तब्बल 27 वर्षांनंतर पुण्यात आयसीसी पुरुष विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे सामने होणार आहेत. या वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेतील पाच सामन्यांचे यजमानपद महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमला मिळाले आहेत. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्र प्रिमियर लीगच्या अंतिम सामन्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटना विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. दरम्यान, मुख्य आकर्षण भारतीय क्रिकेट संघाचा 19 ऑक्टोबरचा बांगलादेश विरुद्धचा सामना असेल.
यापूर्वी 1996 च्या विश्वचषक स्पर्धेत 29 फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिज वि. केनिया हा सामना पुण्यातील नेहरु स्टेडियमवर खेळला गेला होता. केनियाने या सामन्यात त्यांचा 166 धावत खुर्दा उडूनदेखील वेस्ट इंडिजचा 73 धावांनी पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवला होता. गहुंजेवर भारत विरुद्ध बांगलादेश या सामन्याखेरीज अफगाणिस्तान वि क्वालिफायर 2, न्यूझीलँड वि दक्षिण आफ्रिका, इंग्लंड वि क्वालिफायर 1 आणि ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश हे इतर चार सामने होतील.
पवार म्हणाले, विश्वचषक स्पर्धेचे 27 वर्षांनी पुण्यात आयोजन होणार आहे. भारतीय संघाचे सामने आयोजित करणे, ही कायमच आनंदाची बाब असते आणि विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन करणे ही तेवढीच आनंददायी आणि आव्हानात्मक गोष्ट आहे. ही संधी आम्हाला मिळाली हा आम्ही आमचा सन्मान मानतो.
रोहित पवारांकडून बीसीसीआय व जय शहांचे आभार
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला आणि पर्यायाने पुण्याला विश्वचषक आयोजनाची संधी दिल्याबद्दल आम्ही बीसीसीआयचे व जय शहा, मा. सचिव, बीसीसीआय यांचे विशेष आभार मानतो. अन्य राज्य संघटनादेखील या सामन्यांच्या आयोजनासाठी कसोशीने प्रयत्न करत होत्या. परंतु, बीसीसीआयने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या आयोजन क्षमतेवर विश्वास दाखवला याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. अतिशय कमी वेळात ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्हाला बीसीसीआयने परवानगी तर दिलीच, त्याशिवाय यशस्वी आयोजनासाठी मौल्यवान मार्गदर्शनही केले, असेही पवार यांनी या वेळी नमूद केले.
पुण्यातील वर्ल्ड कपचे सामने
ऑक्टो. 19 : भारत वि. बांगलादेश
ऑक्टोबर 30 : अफगाणिस्तान वि क्वालिफायर 2
नोव्हेंबर 1 : न्यूझीलँड वि दक्षिण आफ्रिका
नोव्हेंबर 8 : इंग्लंड वि क्वालिफायर 1
नोव्हेंबर 12 : ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश.
सर्व सामने दु. 2 वाजता सुरू होतील. मात्र, ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश सामना सकाळी 10.30 ला सुरू होईल.