कागल प्रतिनिधी
हमीदवाडा येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत विविध गटांसाठी 47 लोकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पैकी 19 लोकांनी आज माघार घेतली आहे.
उत्पादक गट मूरगूडमध्ये 5 पैकी 2 उमेदवारांनी माघार घेतल्याने कारखान्याचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक, संभाजी मोरे, तुकाराम ढोले हे बिनविरोध निवडून आले. उत्पादक गट बोरवडेमध्ये 7 पैकी 4 उमेदवारांनी माघार घेतल्याने आनंदा फराकटे, कृष्णा शिंदे, सत्यजित पाटील हे बिनविरोध निवडून आले.
उत्पादक गट कागल गटात 4 पैकी 1 उमेदवाराने माघार घेतल्याने धनाजी बाचणकर, शिवाजीराव इंगळे, महेश घाटगे बिनविरोध निवडून आले. उत्पादक गट मौजे सांगावमध्ये 6 पैकी 3 उमेदवारांनी माघार घेतल्याने कैलास जाधव, प्रकाश पाटील, मंगल तुकान बिनविरोध निवडून आले.
उत्पादक गट कापशी सेनापती या गटात 7 पैकी 4 उमेदवाराने माघार घेतल्याने पुंडलिक पाटील, विश्वास कुराडे, प्रदीप चव्हाण बिनविरोध निवडून आले. बिगर उत्पादक संस्था गटामध्ये 2 पैकी 1 उमेदवाराने माघार घेतल्याने विरेंद्र मंडलिक बिनविरोध निवडून आले. अनुसूचित जाती व जमाती गटात 2 पैकी 1 उमेदवाराने माघार घेतल्याने चित्रगुप्त प्रभावळकर बिनविरोध विजयी झाले.
भटक्या जाती व जमाती गटात 2 पैकी 1 उमेदवाराने माघार घेतल्याने विष्णु बुवा बिनविरोध निवडून आले.
महिला व इतर मागासवर्गीय गटातील उमेदवारांनी माघार घेतली नसली तरी उद्या मंगळवारी हे दोन्ही गट बिनविरोध होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत विद्यमान 9 संचालकाना पुन्हा संधी मिळाली आहे तर 8 विद्यमान संचालकानी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. तसेच 9 नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर महिला गटातील 2 व इतर मागासवर्गीय 1 बिनविरोध होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
91 वयाचा संचालक: निष्ठेला अशीही प्रतिष्ठा
या निवडणुकीत कृष्णा दत्तात्रय शिंदे (वय 91) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कै. खा. सदाशिवराव मंडलिक यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुऊवातीपासून शिंदे निष्ठावंत आहेत. त्यांनी आजवर कोणत्याही पदाची अपेक्षा केली नव्हती. यावेळी मात्र शिंदे यांनी मी मंडलिकांचा निष्ठावंत आहे, मला सेवेची संधी द्यावी, अशी विनंती खा. संजय मंडलिक व सुकाणू समितीपुढे केली. शिंदे यांची बिनविरोध निवड करून निष्ठेला प्रतिष्ठा दिली.