पंतप्रधान मोदींची कार्यकर्त्यांना सूचना : भाजपकडून क्षेत्रीय पंचायत राज परिषदेचे आयोजन
वृत्तसंस्था/ सूरजकुंड
हरियाणाच्या फरिदाबाद येथील सूरजकुंडमध्ये भाजपच्या दोन दिवसीय क्षेत्रीय पंचायत राज परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हर्च्युअली संबोधित करत कार्यकर्त्यांना अनेक कामांची जबाबदारी सोपविली आहे. पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना शहरांऐवजी गावांवर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितले आहे. प्रत्येकी 5 गावांचा समूह तयार करत केंद्रीय योजनांची माहिती देण्याची जबाबदारी पक्ष जिल्हाध्यक्ष तसेच कार्यकर्त्यांना दिली आहे. या परिषदेत हरियाणा, उत्तरप्रदेश, हिमाचल, उत्तराखंड, राजस्थान आणि जम्मू-काश्मीर, लडाखमधील प्रतिनिधी सामील झाले आहेत.
दीपावलीपर्यंत प्रत्येकी 5 गावांचा समूह तयार करत आयुष्मान भारत कार्डच्या लाभार्थ्यांचे संमेलन आयोजित करावे. यात लाभार्थींना योजनेचा कशाप्रकारे लाभ झाला याची माहिती मिळवा. तसेच अन्य लोकांना योजनेचा लाभ मिळवून द्या असे आवाहन मोदींनी पक्ष कार्यकर्त्यांना केले आहे.
अलिकडेच पीक विमान योजनेद्वारे 20 हजार कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. तर वन स्टॉप सेंटरद्वारे एक लाख 25 हजार शेतकरी समृद्धी केंद्रांना देशाला समर्पित करण्यात आला आहे. या केंद्रांना पक्ष कार्यकर्त्यांनी भेट द्यावी असे मोदींनी म्हटले आहे.
जनधन योजनेच्या अंतर्गत 50 कोटी लोकांची बँक खाती सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभार्थींमध्ये माताभगिनींचे प्रमाण अधिक आहे. गावातील प्रत्येक मुलीपर्यंत या योजना पोहोचविण्याचे उद्दिष्ट आहे. भाजप पदाधिकाऱ्यांनी नैसर्गिक शेतीच्या प्रयत्नांना चालना द्यावी. याकरता शेतकऱ्यांना लागणारी मदत उपलब्ध करविण्यात यावी, प्रसंगी प्रशासनाचे सहकार्य घ्यावे असे वक्तव्य मोदींनी केले आहे.