जीएफडीसीचे प्रशिक्षक म्हणून सेवा : कर्ज काढून चालवतात चरितार्थ
मडगाव : शनिवारी आनंदमयी वातावरणात गोवा फुटबॉल विकास मंडळाच्या (जीएफडीसी) मुख्यालयात स्थापनेच्या अकराव्या वर्धापनदिनाचा केक कापल्यानंतर काल रविवारी म्हणजे दुसऱ्याच दिवशी जीएफडीसीला शर्मनाक आणि राज्याच्या फुटबॉलला मान खाली घालावी लागणाऱ्या एका घटनेला सामोरे जावे लागले. भारतीय फुटबॉल संघाचे कप्तानपद भुषविलेले आणि साळगावकर स्पोर्ट्स क्लबला सलग अकरा वर्षे निस्वार्थीपणे सेवा दिलेल्या रॉबर्ट फर्नांडिसला जीएफडीसी अकादमीचे प्रशिक्षक म्हणून सेवा देऊनही मागील तीन वर्षे पगार दिला नसल्याची माहिती खुद्द त्याने तसेच जीएफडीसीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी व सध्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या ग्रास रूट फुटबॉल समितीचे सदस्य आलेक्सो दा कॉस्ता यांनी प्रसारमाध्यमांना काल रविवारी दिली. या घटनेने गोव्याच्या फुटबॉल क्षेत्रास धक्का बसला आहे.
माजी कप्तान तीन वर्षे वेतनविना
2016 मध्ये फुटबॉल प्रशिक्षणातील ‘ब’ लायसेन्स असलेल्या रॉबर्ट फर्नांडिसला जीएफडीसीने दक्षिण गोव्यातील निवासी फुटबॉल अकादमीचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले होते. त्यानंतर 2020 मध्ये परत एकदा जीएफडीसीचे तत्कालिन सीईओ आलेक्स दा कॉस्ता यांनी रॉबर्टला प्रतिमहिना 53,000 वेतन निश्चित केले. मात्र सीईओंची बदली झाल्यानंतर जीएफडीसीने रॉबर्टचे वेतन निम्मे करताना 26,000 असे वेतन देण्याचा नवीन आदेश काढला, असे रॉबर्ट फर्नांडिस प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला. आपण वेतनासाठी कित्येक वेळा निवेदन जीएफडीसीला दिले. ई-मेलसुद्धा केले तसेच जीएफडीसी मंडळातील सदस्यांनाही भेटलो. मात्र आपली आर्त हाक आणि जीवन जगण्यासाठी आणि कुटुंब चालविण्यासाठी चाललेली धडपड त्यांना समजली नाही. आपले वेतन का निम्मे केले याचे कारणही देण्यात आले नाही, असे यावेळी रॉबर्ट फर्नांडिस म्हणाला.
कर्ज काढून रॉबर्ट करतोय उदरनिर्वाह
बारा वेळा भारतीय फुटबॉल संघाचे प्रतिनिधीत्व, एक वेळ देशाचा कप्तान तसेच चार वेळा संतोष चषक फुटबॉल स्पर्धेत आणि एकदा 19 वर्षाखालील फुटबॉल संघाचे गोव्यासाठी प्रतिनिधीत्व केलेला रॉबर्ट फर्नांडिस वेतनाच्या अभावी सध्या कर्ज काढून तसेच मित्रांकडून पैसे उसने घेऊन आपले कुटुंब चालवत आहे. त्याला पत्नी, दोन मुलगे व एक मुलगी असून त्यांचा शिक्षणाचा तसेच आपला संसार चालविण्यासाठी आपण कसे दिवस काढत आहे, हे देवालाच माहीत. कुटुंबात आपण एकटाच कमवणारा असून मुले शिक्षण घेत असल्याने त्यादृष्टीने विचार होणे आवश्यक आहे, असेही रॉबर्ट फर्नांडिस खेदाने म्हणाला.
कुडतरीच्या या पुत्राला न्याय द्या : आलेक्सो डिसोझा
कुडतरीने केवळ राज्यासाठीच नव्हे, तर देशासाठी खेळलेले फुटबॉलपटू तयार केले आहे. आर्मांद कुलासो, आंतोन रिबेलो यांनी कुडतरीचे नाव देशात रोशन केले आहे. रॉबर्ट फर्नांडिस हा सुद्धा कुडतरीतील पुत्र देशासाठी खेळलेला आहे. त्याला न्याय देण्यासाठी कुडतरीतीलच नव्हे तर गोव्यातील सर्व आजी-माजी फुटबॉलपटू तसेच फुटबॉलप्रेमींनी एकत्र येऊन रॉबर्ट फर्नांडिसवर जीएफडीसीने केलेल्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, असे यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना जीएफडीसीचे माजी सीईओ आलेक्सो दा कॉस्ता म्हणाले.
जीएफडीसीमध्ये संघसाथी असूनही अन्याय
सध्या जीएफडीसीच्या मंडळात ब्रह्मानंद शंखवाळकर व ब्रुनो कुतिन्हो हे अर्जुन पुरस्कारप्राप्त विजेते आहेत. ब्रुनो तर रॉबर्ट समवेत खेळलेला आहे. जीएफएचे अध्यक्ष डॉ. कायतान फर्नांडिस, माजी फुटबॉलपटू लॅक्टर मास्कारेन्हस तसेच माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो हे सुद्धा मंडळावर आहेत. आपल्या संघसाथीवर हा झालेला अन्याय ब्रुनो व इतरांना दिसत नाही काय, असा सवालही आलेक्सो दा कॉस्ताने केला आहे.
आज रॉबर्टला घेऊन जाणार विधानसभेत
सोमवारी आपण स्वत: रॉबर्ट फर्नांडिसला घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या चॅम्बरमध्ये जाणार असल्याचे दा कॉस्ता म्हणाले. साळगावकर क्लबसाठी सलग 11 वर्षे खेळलेल्या संघाचे मालक उद्योगपती शिवानंद साळगावकर यांनीही रॉबर्टला न्याय देण्यासाठी आपल्यासमवेत मुख्यमंत्री व क्रीडामंत्री याना भेटण्यास यावे, असे आवाहनही यावेळी दा कॉस्ता यांनी केले.