दिल्ली, मुंबईतील कार्यालयात कसून तपासणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयात प्राप्तिकर विभागाच्या (आयटी) पथकाचे सर्वेक्षण दुसऱया दिवशीही सुरू आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱयांनी बीबीसीवर आंतरराष्ट्रीय करात अनियमिततेचा आरोप केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अधिकारी लॅपटॉप आणि कागदपत्रांची छाननी करत आहेत.
तपासासाठी दाखल झालेले प्राप्तिकर अधिकारी 2012 पासून आतापर्यंतच्या खात्यांचा तपशील तपासत आहेत. तपास अधिकाऱयांनी वित्त विभागातील कर्मचाऱयांचे मोबाईल, लॅपटॉप-डेस्कटॉप जप्त केले आहेत. तपासादरम्यान प्राप्तिकर अधिकारी आणि बीबीसी इंडियाच्या संपादकांमध्ये वादावादीही झाली आहे. दुसरीकडे, बीबीसीने आपल्या कर्मचाऱयांना मेलद्वारे सहकार्य करण्यास सांगितले आहे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांनी प्रामाणिकपणे द्यावे, असे सांगण्यात आले.
प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱयांनी मंगळवारी सकाळी 11 वाजता बीबीसी इंडियाच्या कार्यालयात छापा टाकत तपासाची कारवाई सुरू केली होती. बीबीसीचे कार्यालय दिल्लीतील केजी मार्ग भागात एचटी टॉवरच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर आहे. येथे 24 आयटी सदस्यांच्या पथकाने छापा टाकला. तसेच मुंबईतील सांताक्रूझ भागातील बीबीसी स्टुडिओमध्येही शोध सुरू आहे. दुसरीकडे बीबीसीने ट्विट करत प्राप्तिकर विभागाची टीम दिल्ली आणि मुंबईच्या कार्यालयात हजर असून त्यांना पूर्णपणे सहकार्य केले जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तपासाला सहकार्य करा ः बीबीसीचे कर्मचाऱयांना ‘मेल’
बीबीसी व्यवस्थापनाने बुधवारी सकाळी कर्मचाऱयांना मेल केले. यामध्ये कर्मचाऱयांना प्रत्येक प्रश्नाला प्रामाणिकपणे उत्तर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱयांनी चौकशीसाठी पाचारण केल्यास त्यांना भेटावेच लागेल, असे सर्व कर्मचाऱयांना कळविण्यात आले. बीबीसीची संस्थात्मक रचना, उपक्रम, संस्था आणि भारतातील काम याबाबत प्रश्न विचारणे हे तपासाच्या कक्षेत येते आणि असे प्रश्न विचारले जाऊ शकतात, असेही सांगण्यात आले. तुमचे वैयक्तिक उत्पन्न आणि आयकर बद्दलचे प्रश्न सर्वेक्षणाच्या कक्षेबाहेर असून तुम्ही त्यांची उत्तरे देण्यास नकार देऊ शकता. तुमच्या संगणक प्रणालीतून कोणतीही माहिती हटवू नका किंवा प्राप्तिकर अधिकाऱयांपासून लपवू नका, असेही निर्देश देण्यात आले आहेत. बीबीसीने भारतात काम करणाऱया कर्मचाऱयांच्या मदतीसाठी एक हेल्पलाईनही सुरू केली आहे.