एका महिन्यात अशाप्रकारची दुसरी घटना
वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तानात हिंदू मुलींचे अपहरण करत त्यांचे धर्मांतर घडवून आणण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण करत तिला बळजबरीने धर्मांतर करविले आहे. सिंधमध्ये एका महिन्यात अशाप्रकारची ही दुसरी घटना आहे. सिंधच्या टांडो अल्लायार भागात 14 वर्षीय हिंदू मुलगी जमनासोबत ही घटना घडली आहे. जमना स्वतःच्या घरी जात असताना तिचे अपहरण करण्यात आले होते. आता तिचे धर्मांतर करविण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर जमनाचे कुटुंबीय न्यायासाठी वणवण भटकत आहेत. सिंध प्रांतात हिंदू मुलींच्या बळजबरीच्या घटना वाढल्याने तेथील अल्पसंख्याक समुदायात संतापाचे वातावरण आहे. हिंदू समुदायाने याविरोधात अनेकदा निदर्शने केली असली तरीही पोलीस आणि प्रशासनाकडून त्यांना कुठल्याच प्रकारचा न्याय मिळत नसल्याचे चित्र आहे.