ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि वरोराचे माजी आमदार मोरेश्वर टेमुर्डे (Moreshwar Temurde) यांचे आज सकाळी राहत्या घरी झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. टेमुर्डे यांच्या इच्छेनुसार त्यांचा मृतदेह चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाला दान करण्यात आला आहे.
टेमुर्डे यांचा चंद्रपूर जिल्ह्याच्या उभारणीत मोठा वाटा होता. वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोन वेळा प्रतिनिधित्व केले. ते 1991 ते 1995 आणि 1995 ते 2000 असे दोन वेळा आमदार हाते. त्यांनी या दोन्ही निवडणुका शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेकडून लढली होती. मात्र, शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करताच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती.
अधिक वाचा : साताऱ्याला आणखी एक दत्ता जाधव परवडणार नाही
माझ्या मृत्यूनंतर देहाला अग्नी देऊ नका, मृतदेह वैद्यकिय महाविद्यालयाला दान करा, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांचा मृतदेह चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्यात आला आहे. टेमुर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.