प्रतिनिधी /काणकोण
लोलये-पोळेचे माजी सरपंच निशांत प्रभुदेसाई यांनी 29 रोजी रात्री आपल्या राहत्या घराच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना घडली आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. प्रभुदेसाई हे 2017 च्या पंचायत निवडणुकीत माशे वॉर्डातून निवडून आले होते.
आपल्या कारकिर्दीत वॉर्डातील प्रत्येक व्यक्तीच्या समस्या सोडविण्यासाठी ते तत्काळ उपस्थित राहत असत. वॉर्डातील गटार दुरुस्ती असो अथवा वीज समस्या असो, त्यासाठी काळ-वेळ न बघता ते धावून येत असत. कोरोना महामारीच्या काळात प्रभुदेसाई यांनी आपल्या वॉर्डाबरोबरच उर्वरित पंचायत क्षेत्रातील लोकांसाठी भरीव असे काम केले होते. त्यामुळे त्यांना रस्त्यावरील अडचणी सोडविणारे पंच म्हणून सर्व जण ओळखत असत. नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत त्यांचा वॉर्ड हा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यानंतर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. स्वतः अविवाहित असलेल्या प्रभुदेसाई यांनी आपल्या भावाच्या पत्नीला त्या वॉर्डातून निवडणुकीत उतरवून प्रचंड विरोधाचा सामना करत जिंकून आणले होते. प्रभुदेसाई यांच्या आत्महत्येची घटना अगदी धक्कादायक अशी असून काल-परवा देखील ते सर्व मित्रांशी मिळून-मिसळून वागले होते, अशी प्रतिक्रिया त्यांचे अगदी जवळचे मित्र राहिलेले लोलये पंचायतीचे माजी सरपंच अजय लोलयेकर यांनी व्यक्त केली. या घटनेची खबर मिळताच त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांच्या निवासस्थानी गर्दी केली. काणकोणच्या पोलिसांनी पंचनामा करून शवचिकित्सेसाठी मृतदेह ताब्यात घेतला आहे. त्यांच्यापश्चात आई, वडील, भाऊ आणि अन्य असा परिवार आहे.