आज दुपारी होणार अंत्यसंस्कार
मडगाव : मडगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तसेच अखिल भारतीय खो-खो फेडरेशनचे उपाध्यक्ष तसेच गोवा खो-खो संघटनेचे माजी अध्यक्ष गोकुळदास शिरोडकर (73) यांचे काल अल्पआजाराने राहत्या घरी दु:खद निधन झाले. आज गुरूवार दि. 25 रोजी दुपारी 12 वाजता मडगाव स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्च्यात पत्नी अनुया शिरोडकर (दै. तरूण भारतच्या फातोर्डा प्रतिनिधी), मुलगा : अमेय, स्नुषा : श्रेया, विवाहित कन्या : अमिशा राजेश पेडणेकर तसेच नातवंडे असा परिवार आहे. गोकुळदास शिरोडकर हे मडगावच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रीय होते. मडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते उपनगराध्यक्ष झाले. त्यांना खो-खो खेळाची विशेष आवड होती. अखिल भारतीय खो-खो फेडरेशनचे उपाध्यक्षपद ही त्यांनी भुषविले होते. गोवा खो-खो संघटणेचे अनेक वर्षे ते अध्यक्ष होते. खो-खो खेळासाठी त्यांना जीवबादादा केरकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. गोवा सोफ्ट बॉल संघटनेशी ही ते संबंधीत होते तसेच मडगाव शिगमोत्सव समितीचे संस्थापक सदस्य होते. मडगावात बाबू नायक यांच्या विरोधात त्यांनी मगो पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविली होती. बार्देश बाजार आणि भंडारी समाजाच्या केंद्रीय समितीत ते सक्रीय होते. घोगळ-हाऊसिंग येथील सिद्धीविनायक मंडळाशी ते संबंधीत होते.
मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
मडगावचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गोकुळदास शिरोडकर यांच्या दु:खद निधनावर शोक व्यक्त केला आहे. गोकुळदास शिरोडकर यांनी मडगावच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात दिलेले योगदान हे उल्लेखनिय होते. त्यांच्या निधनाने आपल्याला दु:ख झाले असून त्यांच्या कुंटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे म्हटले आहे.
आपण मार्गदर्शक गमावला
गोकुळदास शिरोडकर हे आपले कौटुंबिक मित्र तसेच मार्गदर्शक होते. त्यांच्या दु:खद निधनाने आपल्याला धक्काच बसला. त्यांनी मडगावात सामाजिक क्षेत्रात भरीव असे योगदान दिले होते. गोवा खो-खो संघटनेची धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली अनेक खेळाडू तयार झाले. त्यांच्या निधनाने न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याचे गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.
दामू नाईक यांना दु:ख
फातोर्डाचे माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस दामू नाईक यांनी देखील गोकुळदास शिरोडकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना त्यांच्या कुंटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे म्हटले आहे.