प्रतिनिधी/ बेळगाव
परिवहनच्या ताफ्यात नवीन चार बसेस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे परिवहनचा डोलारा काहीसा सुरळीत होणार आहे. शक्ती योजनेमुळे प्रवाशांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे आता नवीन बसेस दाखल झाल्याने काहीसा ताण कमी होणार आहे. विशेषत: आंतरराज्य मार्गावर या बसेस धावणार आहेत.
बेळगाव विभागामध्ये बसेसची कमतरता असल्याने सार्वजनिक वाहतूक विस्कळीत होऊ लागली आहे. विभागात तब्बल दीडशेहून अधिक बसेसची कमतरता आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे. दरम्यान, बेळगाव विभागात नवीन बस द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, केवळ चार बसेस देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीवरील ताण कायम राहणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने डिसेंबर अखेरपर्यंत 50 जादा बस देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, तोपर्यंत बसचा प्रवास त्रासदायकच होणार आहे.
कोरोना काळात परिवहनला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे परिवहनच्या तिजोरीत ठणठणाट निर्माण झाला आहे. नवीन बस खरेदी करणे परिवहनला शक्य नाही. अशा परिस्थितीत परिवहनने बीएमटीसीकडून 25 जुन्या बसेस गतवर्षी खरेदी केल्या आहेत. मात्र, त्या पंधरा वर्षांहून अधिक काळ वापरण्यात आल्याने सातत्याने नादुरुस्त होऊ लागल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बस वाहतुकीवर याचा परिणाम होऊ लागला आहे.
बेळगाव विभागातून दररोज साडेसहाशेहून अधिक बसेस विविध मार्गांवर धावतात. मात्र, काही मार्गांवर बसेसची कमतरता दिसून येते. त्यामुळे याचा गैरफायदा खासगी वाहतूकदार घेताना दिसतात. तर कोरोनापासून बंद झालेली काही गावची बससेवा अद्याप सुरू झाली नाही. परिवहनकडे बसेस बरोबरच बसवाहक आणि बसचालकांचीदेखील कमतरता आहे. त्यामुळे बससेवेवर परिणाम होऊ लागला आहे.
सरकारने बेळगाव विभागाला चार बस दिल्या असल्या तरी अद्याप शंभरहून अधिक बसेसची गरज आहे. ताफ्यात दाखल झालेल्या बसेस आंतरराज्य मार्गावर सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे काहीसा ताण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, शहरांतर्गत आणि ग्रामीण भागातील बससेवा सुरळीत करण्यासाठी अतिरिक्त बसेसची गरज भासू लागली आहे.