पिंपरी / प्रतिनिधी :
नवीन वर्षातही उद्योगनगरीत वाहनचोरांचा सुळसुळाट कायम आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत दररोज सरासरी चार याप्रमाणे चोरटय़ांनी शहरातील 237 वाहने लंपास केली आहेत. यात सर्वाधिक संख्या दुचाकींची आहे. चोरीला गेलेली अवघी 23 वाहने सापडली आहेत. वाहने परत मिळण्याचे प्रमाण अवघे 10 टक्के आहे. मागील वर्षभरात 1 हजार 590 वाहने चोरीला गेली असून, वर्षभरात केवळ 365 वाहने शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे वाहन चोरीला गेल्यानंतर शोधण्यापेक्षा ते चोरीला जाऊच नये, म्हणून खबरदारी घेणे जास्त गरजेचे आहे.
सराईत वाहन चोरटे इतर शहरातून येऊन वाहने चोरून नेत असल्याचे अनेक प्रकरणांमध्ये समोर आले आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये वाहनांचे लॉक तोडून वाहने चोरून नेली जातात. काचा फोडून, बनावट चावीच्या सहाय्याने, स्क्रू ड्रायव्हरने दरवाजा उघडून अशा अनेक क्लुप्त्या वापरून चोरटे वाहन चोरी करतात. त्यामुळे वाहन कंपन्यांनी डिजिटल लॉकसाठी इंजिन कंट्रोल युनिट किंवा इंजिन कंट्रोल मॉडय़ुल नावाची प्रणाली विकसित केली. महागडय़ा वाहनांमध्ये डिजिटल लॉक देण्यात आले आहेत. मात्र, चोरटे अशी वाहनेही चोरून नेत आहेत.
चोरटे अशी लढवितात शक्कल
चोरटे डिजिटल लॉक सिस्टमचे एक युनिट स्वत:कडे बाळगतात. डिजिटल लॉक सिस्टम असलेल्या वाहनांच्या काचा फोडून मोटारीतील डिजिटल युनिटचे कनेक्शन त्यांच्याकडे असलेल्या सिस्टीमला जोडतात. यामुळे वाहन तात्पुरत्या कनेक्शनवर काही किलोमीटर सहज जाऊ शकते. विमा कंपन्यांकडून अपघातग्रस्त वाहने लिलाव पद्धतीने घ्यायची. त्या वाहनांच्या मॉडेलची दुसरी वाहने चोरून चोरलेल्या वाहनांना भंगारात घेतलेल्या वाहनांच्या नंबर प्लेट लावून बनावट कागदपत्रे बनवून त्यांची विक्री करायची, असेही प्रकार घडत आहेत. अशा एका टोळीला गुन्हे शाखेने रावेत मधून अटक केली होती.
अधिक वाचा : पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तिघे जागीच ठार
पोलीस यंत्रणा ठरतेय कुचकामी
चोरीला गेलेली वाहने शोधण्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये 237 वाहने चोरीला गेली आहेत. त्यामध्ये 213 दुचाकी, 11 तीनचाकी आणि 13 चारचाकी वाहनांचा समावेश आहे. दोन महिन्यात केवळ 23 वाहने पोलिसांना मिळाली आहेत. हे प्रमाण अवघे दहा टक्के एवढे आहे. दररोज सरासरी चार वाहने चोरीला जात आहेत. तर, तीन दिवसांना एका वाहनाचा शोध लागत आहे.