सेमीकंडक्टर चिप उत्पादनाशी संबंधित करार : मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ चिपच्या स्वप्नाला मोठा धक्का
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तैवानची कंपनी ‘फॉक्सकॉन’ने भारतातील सेमीकंडक्टर चिप उत्पादनासाठी वेदांतासोबतचा करार मोडला आहे. गेल्यावषी दोन्ही कंपन्यांनी 19.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.5 लाख कोटी ऊपये किमतीच्या या करारावर सहमती दर्शवली होती. या करारांतर्गत वेदांता आणि फॉक्सकॉन गुजरातमध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले प्रोडक्शन प्रकल्प उभारणार होते. फॉक्सकॉन कंपनीने या करारातून माघार घेतल्याने मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ चिपच्या स्वप्नाला धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली असली तर माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) मंत्र्यांनी हा व्यवहार संपुष्टात आल्याने देशाच्या उद्दिष्टावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
फॉक्सकॉन कंपनीने वेदांतासोबतच्या संयुक्त उपक्रमात पुढे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, फॉक्सकॉनने हा करार मोडण्याचे कारण दिलेले नाही. आपली कंपनी भारत सरकारच्या मेक इन इंडिया उद्दिष्टांना पूर्ण समर्थन देते. तसेच स्थानिक भागिदारीद्वारे भागधारकांच्या गरजा पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे कंपनीने म्हटले आहे. हा संयुक्त करार पुढे जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर इतर कंपन्यांशी बोलणी सुरू असल्याचे वेदांताच्या वतीने सांगण्यात आले. तसेच आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे. फॉक्सकॉन-वेदांता यांच्यातील करार पुढे जाणार नसल्यामुळे भारताला सेमीकंडक्टर चिप हब बनवण्याच्या आमच्या ध्येयावर परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
गुजरातमध्ये प्रकल्प
गेल्यावषी फेब्रुवारीमध्ये वेदांताने फॉक्सकॉनसोबत संयुक्त उपक्रमासाठी हातमिळवणी केल्यानंतर भारत सरकारच्या सेमीकंडक्टर उत्पादन योजनेसाठी अर्ज केला. या संयुक्त उपक्रमात वेदांतचा 60 टक्के आणि फॉक्सकॉनचा 40 टक्के हिस्सा होता. दोन्ही कंपन्यांना एकत्रितपणे पुढील दोन वर्षांत सेमीकंडक्टर (अर्धसंवाहक) निर्मिती प्रकल्प उभारायचा होता. अहमदाबादमध्ये 1000 एकर जागेवर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पातून सुमारे 1 लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्मयता आहे. तसेच डिस्प्ले मॅन्युपॅक्चरिंग युनिट लहान, मध्यम आणि मोठ्या अॅप्लिकेशन्ससाठी जनरेशन-8 डिस्प्ले तयार करणार आहे.
भारताला इलेक्ट्रॉनिक्स हब म्हणून स्थापित करण्यासाठी सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले अत्यावश्यक आहेत. यातील गुंतवणुकीमुळे पुरवठादार आणि उपकरण असेंबलर्सना भारतात बेस स्थापन करण्यासाठी आकर्षित करण्यात मदत होईल. 2021 मध्ये भारतीय सेमीकंडक्टर बाजाराचे मूल्य 2.16 लाख कोटी ऊपये होते. आता 2026 मध्ये 5.09 लाख कोटीपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. सेमीकंडक्टर चिप्स सिलिकॉनच्या बनलेल्या असतात. सर्किटमध्ये वीज नियंत्रित करण्यासाठी त्या वापरल्या जातात. ही चिप संबंधित गॅजेट्सला मेंदूप्रमाणे ऑपरेट करण्यास मदत करतात