वृत्तसंस्था/ हेलसिंकी
फ्रान्सचा 18 वर्षीय नवोदित फलंदाज गुस्ताव मॅकेऑन हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक नोंदवणारा सर्वात युवा फलंदाज बनला आहे.
वान्ता येथे सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक 2024 युरोप उपविभागीय पात्रता स्पर्धेत स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने हा विक्रम नोंदवला. 18 वर्षे 280 दिवस वय असलेल्या मॅकेऑनने केवळ 61 चेंडूत 109 धावा झोपडल्या. त्यात 5 चौकार, 9 षटकारांचा समावेश होता. शतक नोंदवताना त्याने अफगाणिस्तानच्या हझरतुल्लाह झझाईने नोंदवलेला विक्रम मागे टाकला. 2019 मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने 62 चेंडूत नाबाद 162 धावा तडकावल्या त्यावेळी हझरतुल्लाह 20 वर्षे 337 दिवसांचा होता. मॅकेऑन या स्पर्धेत आघाडीवर असून त्याने 92.50 धावांच्या सरासरीने 185 धावा जमविल्या आहेत. असे असले तरी फ्रान्सला हा सामना गमवावा लागला. स्वित्झर्लंडने फ्रान्सचे 158 धावांचे आव्हान सहज पार करीत विजय साकार केला.