11 जूनपासून मोफत बस प्रवासाची मुभा
बेळगाव : निवडणूक जाहीरनाम्यातील पाच गॅरंटी योजना जारी करण्याची घोषणा सरकारने केली आहे. यामध्ये 11 जूनपासून सर्व महिला, विद्यार्थिनांना मोफत बस प्रवासाची घोषणा केली आहे. त्यामुळे शहरातील वडाप वाहनधारकांची धाबे दणाणले आहेत. महिलांना 11 जूनपासून मोफत प्रवास मिळणार असल्याने महिला प्रवासी परिवहनच्या बसला प्राधान्य देणार आहेत. त्यामुळे वडाप वाहनधारकांची चिंता वाढली आहे. राज्यात 11 जूनपासून शक्ती योजना जारी करण्यात आली आहे. याअंतर्गत महिला आणि विद्यार्थिनांना बसप्रवास करता येणार आहे. निवडणुकीपूर्वी काँग्रेस सरकारने महिलांना मोफत बस प्रवासाचे आश्वासन दिले होते. दरम्यान राज्यात काँग्रेसचे सरकार आल्याने या गॅरंटी योजनेची घोषणा मंत्रिमंडळात झाली आहे. शिवाय महिलांना परिवहनच्या बसमधून मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे महिला प्रवासी आणि विद्यार्थिनांना मोठा दिलासा मिळाला आहे.
महिलांना आता तिकीट काढायची गरज नाही
बेळगाव शहराकडे दैनंदिन येणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या अधिक आहे. शिवाय विद्यार्थिनीदेखील अधिक प्रमाणात आहेत. या सर्व महिलांना आता प्रवासासाठी तिकीट काढायची गरज नाही. शिवाय विद्यार्थिनांनादेखील मोफत बसपास उपलब्ध होणार आहे. महिलांचा मोफत बसप्रवास सुसाट सुरू होणार असला तरी वडाप वाहनधारकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. शिवाय परिवहनलादेखील याचा मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. बेळगाव शहरात मिनीबस, रिक्षा, वडापद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जाते. काही वाहनधारकांचा यावर उदरनिर्वाह चालतो. महिला प्रवाशांची वडापद्वारे ये-जा अधिक असते. मात्र आता सरकारने महिलांसाठी मोफत बसप्रवास सुरू केला आहे. त्यामुळे वडाप वाहनचालक अडचणीत येणार आहेत. आधीच कोरोनामुळे वाहनचालकांना फटका बसला होता. त्यातून मार्गावर येत असतानाच महिलांसाठी शासनाने मोफत बसप्रवासाची सुविधा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वडाप वाहनचालकांसमोर संकट उभे ठाकले आहे.