‘भाडोत्रीं’ची निराशा : गृहज्योती, शक्ती योजनांची मार्गसूची जारी : ‘सेवा सिंधू’वर नोंदणी आवश्यक
महिलांना मोफत प्रवासासाठी ‘शक्ती स्मार्ट कार्ड’
प्रतिनिधी/ बेंगळूर
पाच गॅरंटी योजना जारी करून सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वातील सरकारने राज्यातील जनतेला खूशखबर दिली होती. आता ‘गृहज्योती’ आणि ‘शक्ती’ योजनांसाठी मार्गसूची जारी केली आहे. सोमवारी या योजनांसाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. महिलांना मोफत बसप्रवासाचा लाभ घेण्याकरिता सेवा सिंधू पोर्टलवर अर्ज भरणा करून ‘ंशक्ती स्मार्ट कार्ड’ वितरीत केले जाणार आहे. त्याचप्रमाणे गृहज्योती योजनेसाठी देखील सेवा सिंधू पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. तथापि, ग्राहकाच्या नावे असणाऱ्या एकाच घरगुती मीटरसाठी ही योजना लागू केल्याने भाडोत्री घर घेतलेल्यांची निराशा होणार आहे.
पाच गॅरंटी योजनांपैकी एक असलेल्या गृहज्योती योजनेचीही मार्गसूची सोमवारी जारी करण्यात आली. मात्र, मार्गसूचीत अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. 1 जुलैपासून ही योजना लागू होत आहे. परंतु, घरगुती वीज वापरासाठी असलेल्या ग्राहकाच्या एकाच मीटरसाठी योजनेचा लाभ मिळणार असल्याने भाडोत्री घर घेतलेल्यांची निराशा होणार आहे.
गृहज्योती योजनेसंबंधी ऊर्जा खात्याच्या अतिरिक्त सचिवांनी जारी केलेल्या मार्गसूचीत, ग्राहकाने मागील 12 महिन्यात वापरलेल्या विजेची सरासरी युनिट काढून त्यात अतिरिक्त 10 टक्के युनिट मिळवून प्रमाण निश्चित केले जाईल. कमाल 200 युनिटपर्यंत विजेची सरासरी निघाली तरच त्या ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अतिरिक्त युनिटसाठी ग्राहकांनाच वीज बिल भरावे लागेल. ग्राहकांना मोफत वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्या वा निगमना सरकारकडून साहाय्यधन रुपाने निधी दिला जाणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
स्मार्ट कार्ड वितरणापूर्वी ओखपत्राची सक्ती
11 जूनपासून शक्ती योजनेंतर्गत महिलांना राज्यभरात मोफत प्रवास करता येणार आहे. तर गृहज्योती योजना 1 जुलैपासून लागू केली जात आहे. या योजनेंतर्गत 200 युनिटपर्यंत मोफत वीज दिली जाणार आहे. शक्ती योजनेंतर्गत महिलांना स्मार्ट कार्ड वितरीत केले जातील. याकरिता सेवा सिंधू पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे. पुढील तीन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 11 जूनपासून महिला राज्य परिवहन महामंडळाच्या सामान्य बसेसमधून प्रवास करू शकतीत. स्मार्ट कार्ड वितरण होईपर्यंत महिलांना आधार कार्ड किंवा वास्तव्य असणारा पत्ता असणारे कोणतेही ओळखपत्र वा सरकारी, निमसरकारी खाते/संस्थांनी वितरीत केलेली ओळखपत्रे कंडक्टरना दाखवून प्रवास करता येईल. फक्त राज्यात मोफत प्रवासासाठी ही योजना लागू आहे, असा उल्लेख राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गसूचीत करण्यात आला आहे.
केएसआरटीसी, बीएमटीसी, वायव्य परिवहन निगम आणि ईशान्य परिवहन निगम (कल्याण कर्नाटक रस्ते परिवहन निगम) या चारीही परिवहन मंडळांच्या शहरी, सामान्य आणि एक्स्प्रेस बसेसमधून विद्यार्थिनींसह सर्व महिलांना मोफत प्रवास करता येईल. तृतीयपंथीयांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
बॉक्स……
भाडोत्री घरातील रहिवासी ‘गृहज्योती’पासून वंचित
2 जून रोजी मंत्रिमंडळ बैठकीत गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सर्वांना गृहज्योती योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले होते. त्याआधी दोन दिवस अगोदर ऊर्जा खात्यातील बैठक घेतलेल्या मंत्री के. जे. जॉर्ज यांनी आर. आर. क्रमांकानुसार मोफत वीज पुरवठा केला जाईल. भाडोत्री वास्तव्य करणारे, घरमालक असा भेद करणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, जारी करण्यात आलेल्या मार्गसूचीत वीज वापरकर्त्याच्या नावे असणाऱ्या एकाच मीटरसाठी योजना लागू होईल, असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे भाडोत्री घरात राहणाऱ्या अनेकांना या योजनेपासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे.
शक्ती योजनेची मार्गसूची…..
► राज्यांतर्गत प्रवासासाठी ही योजना लागू आहे.
► ऐषआरामी बसेस राजहंस, नॉन एसी स्लीपर, वज्र, वायूवज्र, ऐरावत, ऐरावत क्लब क्लास, ऐरावत गोल्ड क्लास, अंबारी उत्सव, फ्लायबस, ईव्ही पॉवर प्लस या बसेस या योजनेंतर्गत येणार नाहीत.
► बेंगळूर शहर पहिवहन मंडळ वगळता उर्वरित तीन परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये (शक्ती योजनेत न येणाऱ्या बसेस वगळता) पुरुषांसाठी 50 टक्के जागा राखीव ठेवाव्यात.
► या योजनेसाठी चारीही परिवहन महामंडळांना येणारा खर्च शून्य तिकीट/शक्ती स्मार्ट कार्डच्या आधारे सरकारकडून देण्यात येईल.
► सेवा सिंधू पोर्टलवर अर्ज मागवून स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया पुढील तीन महिन्यात पूर्ण केली जाईल.
► स्मार्ट कार्ड वितरण होईपर्यंत भारत सरकार/कर्नाटक सरकारच्या विविध खात्यांकडून वितरीत झालेली ओळखपत्रे आणि वास्तव्याचा पत्ता असणारी कोणतीही ओळखपत्रे शून्य तिकीट देताना कंडक्टरना दाखवावे लागेल.
गृहज्योती योजनेची मार्गसूची…
► ही योजना केवळ घरगुती वापरासाठी लागू असेल, व्यावसायिक उद्देशासाठी नाही.
► निश्चित केलेल्या युनिटपर्यंत वीज वापरली तरी बिल येईल. मात्र, ते भरावे लागणार नाही.
► निश्चित बिलापेक्षा अधिक प्रमाणात वीज वापर झाल्यास अतिरिक्त युनिटसाठी ग्राहकांना बिल द्यावे लागेल.
► दरमहा मीटर रिडिंग करताना एकूण वीज वापराच्या प्रमाणानुसार बिलात नोंदणी करणे. जर 200 युनिटपेक्षा जास्त वीज वापरल्यास संपूर्ण बिल ग्राहकाने भरावे.
► या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी सेवा सिंधू पोर्टवर अर्ज दाखल करावा.
► प्रत्येक लाभार्थीने आपला कस्टमर आयडी/अकाऊंट आयडी आधार क्रमांकाशी लिंक करणे सक्तीचे.
► भाग्यज्योती, कुटीर ज्योती, अमृत ज्योती योजना यापुढे गृहज्योती योजनेत विलिन केल्या जात आहेत.
► जून महिन्यापर्यंतचे बिल किंवा जूनपूर्वीची इतर बाकी असेल तर ग्राहकांनी तीन महिन्याच्या आत भरावी.
► घरगुती वीज वापरणाऱ्यांच्या नावे एकापेक्षा अधिक मीटर असतील तर एका मीटरसाठी योजन लागू