धर्मवीर संभाजी चौकातील धोकादायक स्ट्रक्चर हटविले
प्रतिनिधी/ बेळगाव
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर आणि उपनगरांतील जाहिरात फलक हटविण्याची मोहीम जोरदार सुरू आहे. केवळ जाहिराती नव्हे तर कॅन्टोन्मेंट हद्दीतील धोकादायक स्ट्रक्चरही हटविण्यात आले आहेत. त्यामुळे विविध चौक आणि मुख्य रस्ते जाहिरातींच्या विळख्यातून मुक्त झाले आहेत. मात्र, धर्मवीर संभाजी चौकातील धोकादायक स्ट्रक्चरकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले होते.
निवडणूक काळात राजकीय व्यक्तींच्या तसेच योजनांच्या जाहिराती लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अलीकडे सर्व प्रकारच्या जाहिरातींवर महापालिकेने बडगा उगारला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जाहिरात फलक हटविण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्येक जाहिरातीसाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे महापालिकेचे अधिकारी सांगत आहेत. यापूर्वी महापालिका हद्दीतील जाहिरात फलक हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. त्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्डने मुख्य रस्ते आणि विविध चौकांतील जाहिरात फलक हटविले होते. तसेच धोकादायक स्ट्रक्चरही हटविण्याची कारवाई करण्यात आली.
मात्र, बंगलो परिसरातील जाहिरात फलक हटविण्यास आक्षेप घेण्यात आल्याने कॅन्टोन्मेंटने जाहिरात फलक हटविण्याची जबाबदारी झटकली होती. निवडणूक जाहीर होताच या परिसरातील 23 जाहिरात फलक हटविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला केली होती. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व फलक हटविण्यात यावेत, अशी सूचना रिटर्निंग अधिकाऱ्यांनी केली. शुक्रवारी कॅन्टोन्मेंट हद्दीतील बंगलोमध्ये उभारण्यात आलेले सर्व जाहिरात फलक हटविण्यात आले. त्यानंतर शनिवारी सकाळपासून स्ट्रक्चरदेखील मुळासकट पाडण्यात आले. सदर स्ट्रक्चर हटविण्याऐवजी केवळ कट करून बंगलो परिसरात पाडण्यात आले आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत स्ट्रक्चर हटविण्याचे काम सुरू होते.
स्ट्रक्चर आणि जाहिरात फलक हटविण्यात आल्याने शहरातील विविध चौक आणि रस्ते जाहिरातींच्या विळख्यातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे मोकळे झाल्यासारखे दिसत आहेत. एरवी सर्वत्र जाहिरातींचे फलक लावण्यात आल्याने सौंदर्य झाकोळले होते. मात्र, विविध चौक आणि मुख्य रस्ते जाहिरातमुक्त बनले आहेत. यापुढे हे दृष्य असेच राहणार का, असा मुद्दा शहरवासियांतून उपस्थित करण्यात येत आहे.
कॅन्टोन्मेंट अन् बंगलो परिसरातील जाहिरात फलक हटविले
कॅन्टोन्मेंट आणि बंगलो परिसरातील जाहिरात फलक आणि स्ट्रक्चर हटविण्याची कारवाई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आली. मात्र, धर्मवीर संभाजी चौकात असलेली धोकादायक स्ट्रक्चर हटविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. सदर बसस्थानकावर असलेले स्ट्रक्चर खराब झाले असल्याने जाहिराती लावण्यास बंदी आहे. पण सदर जाहिरात फलकांचे स्ट्रक्चर हटविण्याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नव्हती. मात्र, रविवारी सुटीदिवशी विशेष मोहीम राबवून हे स्ट्रक्चरदेखील हटविण्यात आले.