राज्यभरात गणेशोत्सव आनंदात साजरा होत आहे. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. ही गर्दी अनियंत्रित झाल्याने मंडळाचे पदाधिकारी आणि भाविकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी देशभरातून भाविक दाखल झाले आहेत. या मंडळाच्या मंडपात मोठी गर्दी आहे. गणरायाच्या मंडपात सुरक्षेसाठी पोलीस आणि कार्यकर्ते तैनात आहेत. मात्र, गर्दीचा रेटा प्रचंड असल्यामुळे गर्दी नियंत्रित करणं अशक्य झाले. दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या भाविकांना मंडळाच्या पदाधिकाऱयांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर भाविक आणि मंडळाचे कार्यकर्ते आपापसांत भिडले. यादरम्यान मंडपात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावरुन मंडळाचे व्यवस्थापन कुचकामी ठरल्याचे दिसत आहे.