गणरायाच्या स्वागतासाठी धडपड : पूजेच्या साहित्याची आवक
बेळगाव : गणेशोत्सव तोंडावर आल्याने भक्तांची लगबग सुरू आहे. लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे बाजारात सजावट आणि पूजेच्या साहित्याला बहर येत आहे. फळा-फुलांबरोबरच पूजेच्या साहित्याची मागणी वाढत आहे. बाजारपेठेला गणरायाच्या साहित्याने झगमगाट आला आहे. सजावट आणि पूजा साहित्याने बाजार फुलू लागला आहे. विशेषत: फळे, फुलांबरोबर कापूर, कंटी, लाल कापड, रुमाल, अगरबत्ती, धूप, लाकडी पाट, समई, आरतीचे ताम्हण, हळद-कुंकू, अबिर-गुलाल, रांगोळी, नारळ, विड्याची पाने, सुपारी, दुर्वा, हार आदीची खरेदी होत आहे. गणपतीसाठी चांदीच्या दागिन्यांचीही खरेदी होत आहे.
गणेशोत्सवासाठी बाजारात विविध फळे दाखल झाली आहेत. पेरू 100 रु. किलो, डाळिंब 140 ते 240 रु. किलो, चिकू 160 रु. किलो, सफरचंद 140 ते 200 रु. किलो, संत्री (विदेशी) 200 ते 260 रु. किलो, मोसंबी 80 ते 120 रु. किलो, सीताफळ 120 ते 160 रु. किलो, पपई 30 ते 70 रुपये नग, किवी 130 ते 200 रु. किलो, जवारी केळी 60 ते 100 रु. डझन, विलायची केळी 120 रु. किलो, द्राक्षे (विदेशी) 400 रु. किलो, ड्रॅगन फ्रूट्स 200 रु. किलो असा फळांचा दर आहे. सार्वजनिक मूर्तींसमोर पूजेचे साहित्य व फळांची आरास केली जाते. त्यामुळे बाजारात पूजेचे साहित्य आणि फळांची आवक वाढली आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे. शिवाय गणेशोत्सव काळात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गौरी पूजन, ओवसा आदी पूजा केल्या जातात. त्यामुळे पूजेच्या साहित्याला विशेष मागणी असते.
बाजारात पूजेच्या साहित्याचा
बॉक्स दाखल झाला आहे. यामध्ये पूजेचे संपूर्ण साहित्य उपलब्ध आहे. याला मागणी वाढू लागली आहे. यंदा पूजेचे साहित्य व फळांच्या किमती काहीशा वाढल्या आहेत.
बाजारात फुलांची आवक
गणेशोत्सवासाठी बाजारपेठेत झेंडू, शेवंती, गुलाब, कमळ, केवडा आदी फुलांची आवक वाढत आहे. शनिवार, रविवारी मोठ्या प्रमाणात हार-फुलांची विक्री होणार आहे. त्यामुळे आतापासूनच बाजारात फुलांची आवक दिसून येत आहे.