ओटवणे/ प्रतिनिधी-
मोठ्या शहरातील रक्तपेढ्यांप्रमाणे जिल्ह्यातील सर्व रक्तपेढ्या अद्ययावत करण्यासह त्यांची रक्त साठवण क्षमता वाढवण्यासाठी आपल्या खात्यामार्फत पुरेसा निधी द्यावा अशी मागणी सावंतवाडी येथील युवा रक्तदाता संघटनेच्यावतीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. मंत्री रविंद्र चव्हाण आपला रायगड ते सिंधुदुर्ग दौरा आटोपून गोवा विमान तळाकडे जाताना पेडणे येथे युवा रक्तदाता संघटनेने त्यांची भेट घेतली.
यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी प्रथम राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्याबद्दल रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जिल्ह्यातील रक्तपेढ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या विविध समस्याबाबत चर्चा केली. या समस्या सोडविण्यासह या रक्तपेढ्या अद्ययावत करण्यासाठी निधी देण्याची मागणी केली. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे मेहर पडते, वसंत सावंत, अर्चित पोकळे, देवेश पडते, सिध्देश मांजरेकर, सूरज मठकर, गौतम माठेकर, अनिकेत पाटणकर आदी उपस्थित होते.