नगरपालिका प्रशासन संचालनालयाचा पालिकांना इशारा
पणजी : वार्षिक हिशोब तपासणी (ऑडिट) पूर्ण केली नसेल तर नगरपालिकांना निधी मिळणार नसल्याचे नगरपालिका प्रशासन संचालनालयाने बजावले असून त्यासंदर्भात एक परिपत्रक काढण्यात येऊन ते पालिकांना पाठवण्यात येणार आहे. शिवाय पालिकेतील प्रकल्प वेळेवर पूर्ण करणे तसेच त्यांचे व्यवस्थापन या करीता संचालनालयातर्फे एक समिती स्थापन करण्यात आली आहे. पालिकेतील प्रकल्प, इतर कामे पूर्ण होण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचे ठरवण्यात आले असून हिशोब तपासणी झाली नसल्यास त्याचा जाबही विचारण्यात येणार आहे. आर्थिक वर्ष 2022-23 ची हिशोब तपासणी अहवाल (ऑडिट) सादर केल्यावर सहकारी अनुदान इतर निधीचा विचार करण्याचे सक्त निर्देश नगरविकासमंत्री विश्वजित राणे यांनी खात्याला दिले आहेत. खात्याने त्याची कार्यवाही करण्याचे ठरविले असून तसे परिपत्रक लवकरच काढले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या निर्देशांचे पालन न केल्यास संबंधित पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास जबाबदार धरून त्याच्यावर कारवाई करण्याचा इशारा नगरविकास खात्याने दिला आहे. सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या निधीचा योग्य वापर झाला पहिजे. त्यासाठी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि इतर नगरसेवकांना विश्वासात घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी पुढे जावे. प्रकल्प आणि इतर कामे त्यांनी साकारावीत, असे आदेशही त्यांना खात्यातर्फे देण्यात आले आहेत.