ऑनलाईन टीम / तरुण भारत :
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त भंडारा शहरासह जिल्ह्यात मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर नाना पटोले यांचा “भावी मुख्यमंत्री” म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
साकोली विधानसभचे आमदार नाना पटोले यांचा उद्या (5 जून) वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भंडाऱ्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भंडारा शहरासह जिल्ह्यात बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर पटोले यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
या बॅनरविषयी समजल्यावर नाना पटोले म्हणाले, अशा प्रकारचे पोस्टर्स कोणीही लावू नयेत. माझा हा वाढदिवस मला सामाजिक कार्य करत साजरा करायचा आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने विद्यार्थ्यांना हवं तसं शिक्षण घेता येत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहत मी हा वाढदिवस साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.